'उद्धव ठाकरेंनी घेतलेली शपथ खरी,अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा ...'; शिंदेंच्या आमदाराने सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 10:07 AM2024-03-09T10:07:44+5:302024-03-09T10:14:49+5:30
उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदाराने दुजोरा दिला आहे.
Uddhav Thackeray ( Marathi News ) : मुंबई- देशात लोकसभा निवडणुकांची घोषणा काही दिवसातच होणार आहे. सर्व पक्षांनी तयारीही केली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. ठाकरे दोन दिवसापूर्वी धाराशिव दौऱ्यावर होते, यावेळी सभेत बोलताना त्यांनी २०१९ मध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांसोबत बैठकीत झालेल्या चर्चेचा मुद्दा उपस्थित करत तुळजाभवानी मातेची शपथ घेतली आणि म्हणाले 'अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता', यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अमित शाहांच्या घरी रात्री महायुतीची बैठक; दिल्लीत ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा धाराशिव दौरा केला. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, तुळजाभवानी मातेची शपथ घेऊन सांगतो की, मी खोटे बोलत नाही, अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता, २०१९ मध्ये मातोश्रीमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत त्यांना हा शब्द दिला होता, असंही उद्धव ठाकरे म्हणाले, यामुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबचा मुद्दा चर्चेत आला आहे, यावर आता एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे.
आमदार संजय शिरसाट काय म्हणाले?
शिवसेनेतील आमदार संजय शिरसाट म्हणाले, मुख्यमंत्रिपद प्रत्येकी अडीच वर्षे विभागून घेण्याबाबत शब्द दिला होता याबाबत काल उद्धव ठाकरे यांनी तुळजा भवानीची शपथ घेतली ती खरी आहे. पण पहिले अडीच वर्ष भाजप घेणार होतं आणि नंतरची अडीच वर्ष शिवसेना घेणार होते. पण त्यांना युती करायची नव्हती भाजपसोबत जायचेच नव्हते, यासाठी त्यांनी पहिले अडीच वर्षाची अट घातली. शेवटच्या क्षणी भाजपने त्यांना पहिले अडीच वर्षे देण्याचं मान्य केले. पण तरीही त्यांनी युती न करण्याचा निर्णय घेतला, शरद पवारांनी ठाकरेंना पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची ऑफर केली होती या लालसेपोटी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केला होता, असंही शिरसाट म्हणाले.