मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून चांगलेच राजकारण तापणार असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील विधानपरिषद निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं आहे. त्यातच आज माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पालघरमध्ये दोन साधूंच्या झालेल्या हत्या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमध्ये उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेच्या नेमणुकीबाबत देखील चर्चा झाली असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
तत्पूर्वी, राज्य मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरे यांना नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठविण्याची शिफारस केली होती. आता कॅबिनेटने मंजुरी दिलेली असतानाही आमदारकीच्या प्रस्तावावर राज्यपालांनी अजूनही आपल्या संमतीची मोहोर उठवलेली नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली आहे. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्यानं या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे.