Join us

"खरी पोलखोल सभा १४ तारखेनंतर घेतो," बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 5:37 AM

नुसते मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले, तर यांची हातभर फाटली आणि म्हणे यांनी मशीद पाडली, फडणवीस यांनी शिवसेनेच्या दाव्याची उडवली खिल्ली. 

मुंबई : मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे १४ तारखेला जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे १४ तारखेनंतरच खरी पोलखोल सभा घेणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आपल्या बूस्टर डोस सभेत केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडतानाच बाबरी पाडल्याचा शिवसेनेचा दावाही त्यांनी खोडून काढला. येथील सोमय्या मैदानात भाजपची बूस्टर डोस सभा झाली. यावेळी फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजप नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, बाबरी पडली, तेव्हा कोणत्या बिळात होतात, असा सवाल शिवसेना करते, पण आम्ही बाबरी ढाचा पाडला. बाबरी ढाचा पाडल्याप्रकरणी ३२ जणांवर खटला चालला. त्या ३२ जणांमध्ये शिवसेनेचा एकही नेता नव्हता. नुसते मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले, तर यांची हातभर फाटली आणि म्हणे यांनी मशीद पाडली, अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेच्या दाव्याची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री म्हणतात, विरोधकांवर तुटून पडा. पण लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही, अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर भूमिका मांडली. राज्यात महाविकास आघाडी सरकारने आणीबाणी आणून ठेवली. बिल्डर, दारू दुकानदार, विदेशी मद्यपींना मदत केली. पण बारा बलुतेदारांना काहीच दिले नाही. मुख्यमंत्र्यांचे वर्क फ्रॉम होम माहित होते, पण सरकारचे आता वर्क फ्रॉम जेल सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

‘मी १८ दिवस तुरुंगात होतो’हो, बाबरी ढाचा पाडला, तेव्हा मी तेथे होतो. भाजपचे अनेक नेते तेव्हा अयोध्येत होते. मी स्वत: त्या आधीची कारसेवाही केली. त्यामुळे बदायूच्या तुरुंगात १८ दिवसांचा तुरुंगवासही भोगला. ढाचा पाडल्यानंतर ज्या ३२ जणांवर खटले चालले, त्यात शिवसेनेचा महाराष्ट्रातील एकही नेता नव्हता, असेही फडणवीस म्हणाले.

रावणाच्या बाजूचे की रामाचे ते तरी सांगा...?आता महाराष्ट्रात ‘हनुमान चालीसा’ म्हटले की राजद्रोह ठरतो. त्या राणांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणून राज्य उलथवायचा प्रयत्न केल्याचे आरोपपत्रात म्हटले. आता हनुमान चालीसा म्हटल्यावर रामाचे राज्य उलथवले जाते की रावणाचे, असा प्रश्न करतानाच, तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे, याचा एकदा निकाल लावा, असे आव्हानही फडणवीस यांनी दिले.

बाबरीचे श्रेय न घेण्याचे बैठकीत ठरले होतेबाबरी पाडल्याचे श्रेय कोणी घ्यायचे नाही, असे बैठकीत ठरले होते. कारण ते श्रेय रामसेवकांचे आणि कारसेवकांचे होते. आम्हाला प्रसिद्धीचा सोस नाही आणि अनुशासन मोडता येत नाही. त्यामुळे बाबरी ढाचा कोसळल्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न भाजपने केला नसल्याचे फडणवीस म्हणाले. 

भावनिक राजकारण करतच मुंबई लुटली!सामान्य मुंबईकरांचा आवाज म्हणून भाजप मैदानात उतरला. कोणाला महापौर बनवायचे, खुर्ची द्यायची म्हणून आम्ही मैदानात उतरलो नाही. ही मुंबई मुंबईकरांची आहे. ती त्यांना परत करायची आहे. मुंबईच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आता यावरून यांचे पोपट उद्या म्हणणार, की बघा हे मुंबई वेगळी करताहेत. पण, मुंबई वेगळी करण्याची कोणाच्या बापाची हिंमत नाही. मुंबई महाराष्ट्राचीच राहणार आहे. पण, तुम्ही हे भावनिक राजकारण करतच मुंबई लुटली. 

तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, इतके नक्की ! पालिकेतील शिवसेनेच्या आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राच्या नावाला बट्टा लागतो. तुमचे दोन-दोन सवंगडी भ्रष्टाचार करून तुरुंगात जातात, तेव्हा महाराष्ट्र बदनाम होतो. त्यामुळे तुमच्या टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही. कारण तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. आता तर तुम्ही म्हणजे हिंदू नाही म्हणायची वेळ आली असली, तरी मी तसे म्हणणार नाही, पण तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही, इतके नक्की, असेही फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामहाविकास आघाडी