'...म्हणून महाविकास आघाडीवर आरोप होताय'; फॉक्सकॉन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:40 PM2022-09-17T16:40:31+5:302022-09-17T16:45:02+5:30

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

Former CM Uddhav Thackeray has criticized the state government after the Vedanta-Foxconn project went to Gujarat. | '...म्हणून महाविकास आघाडीवर आरोप होताय'; फॉक्सकॉन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

'...म्हणून महाविकास आघाडीवर आरोप होताय'; फॉक्सकॉन प्रकल्पावरुन उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

googlenewsNext

मुंबई- वेदांता-फॉक्सकॉन हा हजारो कोटींची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याचदरम्यान आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. 

वेदांता- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात सुरु व्हावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. तसेच या प्रकल्पाच्यादृष्टीने हलचालीही सुरु झाल्या होत्या. मात्र, आपले अपयश उघडे पडू नये, म्हणून राज्य सरकारकडून महाविकास आघाडी सरकारवर आरोप केले जात आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनात शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करा, असे आदेशही उद्धव ठाकरेंनी दिली. 

तत्पूर्वी, माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात औद्योगिक गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर होता. गुजरातला आम्ही मागे ठेवले, याचा मला आनंदच आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच वेदांता गुजरातमध्ये गेला, म्हणजे तो पाकिस्तानला गेला नसून, गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे अशी आठवणही देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना करून दिली आहे. गेल्या अडीच वर्षातील नाकर्तेपणा, घोटाळे आणि नकारात्मकता यामुळे महाराष्ट्र माघारला, अशी टीका करताना येत्या दोन वर्षांत महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकवर नेल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लघु उद्योग भारतीय संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत. 

वेदांता आणि फॉक्सकॉनचा कल हा गुजरातकडे दिसतोय, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर लगेचच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो. अनिल अग्रवाल यांच्याशी माझे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. लगेचच मी त्यांना फोन लावला. तुम्ही हा प्रकल्प गुजरातला का नेत आहात, याबाबत चर्चा केली. गुजरात जे जे देत आहे, तेच आम्हीही देऊ. किंबहुना त्यापेक्षा अधिक द्यायला तयार आहोत, अशी चर्चाही झाली. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांना पत्र दिले. मी स्वतः अनिल अग्रवाल यांच्या घरी गेलो. मात्र, गुजरातमध्ये जाण्यासंदर्भात आम्ही खूप पुढे गेलो आहोत. अंतिम निर्णयापर्यंत पोहोचलेलो आहोत. मात्र, आमचा कल महाराष्ट्राकडेही आहे. निश्चितच आगामी काळात आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करू, असे आश्वासन त्यांनी मला त्यावेळी दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रत्युत्तर-

फॉक्सकॉन प्रकल्प नेमका कुणामुळे गुजरातला गेला याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारवर निशाणा साधला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील. तळेगावजवळील ११०० एकर जमीनही आम्ही देऊ केली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, ते कमी पडला असावा. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असं शिंदे यांनी म्हटलं.

Web Title: Former CM Uddhav Thackeray has criticized the state government after the Vedanta-Foxconn project went to Gujarat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.