'फक्त हातात भगवा नको, तो हृदयात असावा, शिस्तीनं दसरा मेळाव्याला या'; उद्धव ठाकरेंच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 06:02 PM2022-09-29T18:02:40+5:302022-09-29T18:02:51+5:30
Uddhav Thackeray, Shivsena Dasara Melava: उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
मुंबई- यंदाचा दसरा मेळावा शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळें दोन्हीं गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिस्तीनं या, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या. तसेच फक्त हातात भगवा नको, तो ह्रदयात असावा, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. देशात लोकशाही वाचवण्याची आणि हिंदुत्व टिकवण्याची ही ईश्वराने आपल्याला दिलेली संधी असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे.
दरम्यान, शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.