मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल झालेल्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला होता. माहीमजवळ समुद्रात अनधिकृत मजार उभारली जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला होता. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृत मजारवर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केली होती.
'अतिशय विद्युत वेगाने कारवाई...'; अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया
सदर मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला होता. जर हा मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मात्र राज्य सरकारने अवघ्या १२ तासांत भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला त्याचसोबत जेसीबीने सर्व बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास आले आहे. संपूर्ण ही जागा पूर्ववत करण्यात आली आहे.
"माहीम तो एक Trailer है..."; शिंदे-फडणवीसांच्या कारवाईनंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया
सदर प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आज विधानभवनात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत आणि माहिममधील अनधिकृत बांधकामाबाबत प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ते बांधकाम काही नवीन नव्हतं. त्या विभागाचे दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्यांच्या आधीपासूनचं ते बांधकाम होतं. मात्र जशी स्क्रिप्ट आली असेल, तसं त्यांनी वाचलं असेल..नाहीतर येवढे वर्ष कारवाई होत नाही आणि आता तातडीने कारवाई होते. अशा राज्यात अनेक गोष्टी असतील, तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल, असा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंची रात्री उशिरा सभा संपल्यानंतर त्यानंतर काही जणांनी तिथे जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यामुळे कुणालाही तिथे जाता आले नाही. सकाळी साडेसातच्या सुमारास प्रशासनाने मनुष्यबळ वापरून याठिकाणी अनधिकृत बांधकामावर हातोडा मारण्यात आला. सदर कारवाईनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर प्रकरणामध्ये यश आणि अपयशचा प्रश्न नाहीय. महत्वाचा मुद्दा हा आहे की, मुंबईमध्ये जर अशाप्रकारे अतिक्रमण होत राहिलं, तर या मुंबईची बजबजपुरी व्हायला वेळ लागणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसेच अतिशय विद्युत वेगाने जर प्रशासन कारवाई करत असेल, तर राज्य सरकारचेही आम्ही अभिनंदन करतो, असं संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
माहीम दर्गा ट्रस्टचा दावा-
माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा ६०० वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम