Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे डॉक्टर जखमी गोविंदावर करणार उपचार; फोनवरून दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 01:22 PM2022-09-23T13:22:46+5:302022-09-23T13:37:02+5:30

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमेशच्या तब्येतीची विचारपूस केली.

Former CM Uddhav Thackeray inquired about the health of injured Govinda player Prathamesh Sawant. | Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे डॉक्टर जखमी गोविंदावर करणार उपचार; फोनवरून दिला आधार

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे डॉक्टर जखमी गोविंदावर करणार उपचार; फोनवरून दिला आधार

Next

मुंबई- प्रशमेश सावंत या गोविंदापटूला दहीहंडी उत्सवात थर लावत असताना त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या मते प्रथमेशची प्रकृती यापूर्वी होती त्याचप्रमाणे आहे, त्यात फारसा काही बदल झालेला नाही. गेले अनेक दिवस त्याच्या मंडळाच्या गोविंदा पथकातील कार्यकर्ते आळी-पाळीने रात्रंदिवस अतिदक्षता विभागाच्या बाहेर बसून आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमेशच्या तब्येतीची विचारपूस केली. याबाबत शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी रुग्णालयात भेट घेत माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रथमेशवर उपचार करण्यासाठी येणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. घाटकोपर येथे दहीहंडीचे थर कोसळून मानेला गंभीर दुखापत झाल्याने प्रथमेश जायबंदी झाला. 

प्रथमेश समर क्रीडा मित्र मंडळचा सदस्य असून तो करी रोड येथील कामगारस्व सदन येथील चाळीत लहानपणापासून राहत आहे. आई-वडिलांच्या निधनानंतर त्याची बहीणसुद्धा वारली. या सगळ्या दुःखद घटनांनंतर तो काका-काकीसोबत येथे राहत त्याने त्याचे शालेय शिक्षण सोशल सर्व्हिस लीगच्या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर बारावीचे शिक्षण एमडी महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर सध्या औद्योगिक प्रशिक्षण घेत आहे. रोज सकाळी घरोघरी वृत्तपत्र वाटण्याचे काम, दुपारी महाविद्यालय आणि संध्याकाळी पिझ्झा डिलिव्हरीचे काम करतो, असा त्याचा दिनक्रम असल्याचे त्याचे मित्र सांगतात.

यंदा राज्य सरकारने सर्व निर्बंध उठविल्याने मुंबईसह राज्यभरात दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा झाला. मात्र त्यामध्ये काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या. यातील काही गोविंदांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. मात्र करी रोड येथील साईभक्त क्रीडा मंडळातील जखमी गोविंदाचा संघर्ष महिन्यानंतरही सुरूच आहे. दहीहंडी पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला. त्याच्या पाचव्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातून प्रथमेशच्या कमरेखालील भागातील संवेदना बाधित झाल्या आहेत. त्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रथमेशला सध्या त्याच्या पायावर उभे राहणे शक्य नाही. त्याच्या पायांना अद्यापही संवेदना जाणवत नाहीत.

शिंदे सरकारने घोषित केलेली मदत प्रथमेशला मिळावी-

दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन करताना शिंदे-फडणवीस सरकारने लोकप्रिय घोषणा केल्या. त्यातून यंदा प्रचंड उत्साहात गोविंदा बाहेर पडले. यातील काही गोविंदा जखमी झाले. या जखमींना अद्याप मदत मिळालेली नाही. प्रथमेशला आई-वडीलही नाहीत. नातलगांची आर्थिक स्थितीही बेताचीच आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केल्याप्रमाणे जखमी गोविंदा प्रथमेशला याला ७ लाख ५० हजार रुपयांची मदत केली जावी. त्याला ही मदत तातडीने मिळण्याची गरज आहे, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली आहे.

Web Title: Former CM Uddhav Thackeray inquired about the health of injured Govinda player Prathamesh Sawant.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.