मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खेड तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आगामी ५ मार्च रोजी खेडमध्ये जाहीर सभा घेणार आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच मोठी जाहीर सभा होणार आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ५ मार्चला मैदान अपुरे पडेल, एवढी गर्दी सभेला करा. खेड हा आपला मतदारसंघ आहे, त्यामुळे तो आपल्याकडेच राहायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच सभेच्या दुसऱ्या दिवशीच शिमगा आहे. त्यांचा शिमगा रोजचा आहे, त्यांना बोंबलायला लावू. या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी वाटून घ्या, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
दरम्यान, खेडमध्ये पहिली सभा घेऊन उद्धव ठाकरेंविरोधात अश्रू गाळणाऱ्या रामदास कदमांच्या मतदारसंघातून शिंदे गटाविरोधात प्रचार सुरु केला जाणार आहे. या सभेत ठाकरे रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. आपल्या हातातून आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुढची रणनिती आखण्याआधी पक्ष संघटना मजबूत करण्यावर ठाकरे कुटुंब भर देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पक्षाच्या काही महत्वाच्या नेत्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्र येत्या काळात पिंजून काढणार आहेत. यासाठीचं प्लानिंग केलं जात आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी नेत्यांची एक टीम तयार केली जात आहे. यात आपले गड मजबूत ठेवण्याचं काम ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. पक्ष सध्या ज्या परिस्थितीचा सामना करतोय अशा काळात निवडणुकीला खंबीरपणे सामोरं जायचं असेल तर गाव-खेड्यापासून पक्ष मजबूत करावा लागेल अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे महत्वाचे नेते महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं समजतं.