Join us

'मी असे किळसवाणे...'; किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 3:01 PM

उद्धव ठाकरे आज पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई: माजी खासदार, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचा कथित अश्लील व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधी पक्षांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत ठिकठिकाणी सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारले. विधान परिषदेत मंगळवारी विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. संपूर्ण राज्यात या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित क्लिप्सचे ८ तासांच्या व्हिडीओचे पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे देत कारवाईची मागणी केली. किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. सदर प्रकरणाबाबत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे आज पावसाळी अधिवेशनासाठी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओबाबत प्रश्न विचारला. यावर मी असे किळसवाणे आणि विभत्स व्हिडीओ बघत नाही. परंतु त्यावर राज्यातील जनतेने खास करून माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला वाटत त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 

प्रकार गंभीर, विरोधकांनीही तक्रारी द्याव्यात- फडणवीस

परिषदेतील चर्चेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, राजकारणात अनेकदा असे प्रसंग येतात, ज्यात माणसाचे संपूर्ण राजकीय आयुष्य आणि केलेली पुण्याई पणाला लागते. आता जो काही प्रकार समोर आला आहे, तो गंभीर आहे. त्यासंदर्भात विरोधकांकडे काही तक्रारी असतील तर त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात. आम्ही या विरोधात मंगळवारी विदर्भ, सगळ्याची चौकशी करू. फक्त गृहीतकांच्या आधारे चौकशी करता येणार नाही.

'त्या' महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही

संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही. पोलिस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील. सोमय्या यांनीही आपल्याकडे चौकशीसंदर्भात पत्र दिल्याचे फडणवीस म्हणाले.

किरीट सोमय्या यांचं थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र

एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप ( जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेकिरीट सोमय्या