मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के. नलिनाक्षन यांचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 07:27 AM2021-07-10T07:27:04+5:302021-07-10T07:28:43+5:30
नलिनाक्षन बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करत असताना आरतीच्या वेळी कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला.
मुंबई: मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि सनदी अधिकारी के. नलिनाक्षन (K. Nalinakshan) यांचा होरपळून मृत्यू झाला. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. घरात रोजची पूजा करत असताना बुधवारी सकाळी कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला.
के. नलिनाक्षन हे १९६७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी होते. मूळचे कोझिकोडे येथील नलिनाक्षन यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत मुंबई पालिका आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर वाहतूक आणि सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. चर्चगेट येथील निवासस्थानी ते राहात होते.
नलिनाक्षन बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करत असताना आरतीच्या वेळी कापुराचा दिवा लागून त्यांच्या लुंगीने पेट घेतला. त्यावेळी घरात त्यांची पत्नी आणि घरातील नोकर होते. देवघराला आतून कडी लावलेली असल्याने त्यांना आत जाता आले नाही. शिवाय, त्यांनी लुंगीवर पट्टा लावलेला असल्याने जळती लुंगी बाजूला सारता आली नाही. त्यानंतर त्यांना भायखळा येथील मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहिल्या दिवशी उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या नलिनाक्षन यांची प्रकृती नंतर बिघडतच गेली. ते ८० ते ९० टक्के भाजले होते. त्यातच पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला