मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी २००६ साली आयसेक कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संचालकपदी त्यांची आई संतोष पांडे आणि मुलगा अरमान पांडे यांची नियुक्ती केली होती. या प्रकरणी संजय पांडे, त्यांची आई, मुलगा यांच्यासह एकूण ११ जणांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेली छापेमारी संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू होती. मात्र, संजय पांडे यांचा ठावठिकाणा समजू शकला नाही.
राष्ट्रीय शेअर बाजारात को-लोकेशन झालेला घोटाळा अलिकडेच उजेडात आला आहे. शेअर बाजारातील काही विशिष्ट दलालांना याद्वारे समभागांच्या किमती आधीच समजत असत आणि याचा मोठा फायदा या शेअर दलालांना होत होता. या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करत आहे. सन २०१० ते २०१५ या कालावधीत झालेल्या या घोटाळ्यादरम्यान संजय पांडे यांचीच कंपनी तिथे सिक्युरिटी ऑडिट करत होती. याच प्रकरणात पांडे यांची ईडीने नुकतीच चौकशी केली आहे.
१९८६ सालच्या बॅचचे आयपीएस असलेल्या संजय पांडे यांनी सन २००० साली भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता. आयआयटी कानपूर, आणि हार्वर्ड विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या संजय पांडे यांनी २००१ मधे आयसेक सिक्युरिटीज सोल्युशन ही कंपनी स्थापन केली. मात्र, पांडे यांचा राजीनामा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्वीकारला न गेल्याने ते २००६ साली पुन्हा सेवेत आले. ३० जून रोजी ते मुंबई पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाले.