काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचं दीर्घ आजारानं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 11:19 PM2019-03-07T23:19:31+5:302019-03-08T06:54:54+5:30
काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगानं ग्रस्त होते.
मुंबई- काँग्रेसचे बंडखोर नेते आणि कामगार वर्गाचे सखोल अभ्यासक अजित सावंत यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. ते साठ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाने ग्रस्त होते. माहिम येथील राहत्या घरापासून शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती त्यांचा मुलगा अनिकेत सावंत यांनी दिली. डॉ. अजित सावंत यांनी मुंबई काँग्रेसमध्ये एक दबदबा निर्माण केला होता. त्यांनी मुंबई काँग्रेसचं सरचिटणीस आणि प्रवक्तेपदही भूषवलं होतं. परंतु कालांतरानं काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीमुळे त्यांना पक्ष सोडावा लागला होता. अजित सावंत हे गुरुदास कामत यांचे खंदे समर्थक होते.
पक्षात काहीही किंमत नाही म्हटल्यावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आपमध्ये प्रवेश केला. कामगारांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळवून देण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. कोकण रेल्वेसह कोकणी माणसांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी 'उठवा झेंडा बंडचा' हे पुस्तकही लिहिले होते.
आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संघटना तयार केली. 'बीपीओ-आयटी एम्प्लॉइज कॉन्फेडरेशन' या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आयटी कंपन्यांतील कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांचे वडील, कामगार नेते कॉ. पी. जी. सावंत हे सीटू या कामगार संघटनेत सक्रिय होते.