Join us

काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी वंचितच्या वाटेवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 1:21 AM

अल्पसंख्याक समाजाचा काँग्रेस पक्षावर नाराजीचा सूर; आगामी विधानसभा निवडणुकीत वेगळा पर्याय निवडणार

- मनोहर कुंभेजकर मुंबई : अल्पसंख्याक समाजाचा काँग्रेस पक्षावर नाराजीचा सूर असून आता जो पक्ष समाजाला प्रतिनिधित्व व न्याय देईल त्याच्या बरोबर समाजबांधव जाण्याचे संकेत अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ३० आणि ३१ जूलै रोजी मुंबई काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे या मुलाखती माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांनी घेतल्या. मात्र या मुलखतीकडे आघाडी सरकार मधील माजी मंत्र्यांनी पाठ फिरवली असल्याची माहिती आहे.माजी मंत्री बाबा सिद्दिकी, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांनी उमेदवारी साठी इच्छुकांचा अर्ज केला नाही आणि त्यांनी मुलाखतीकडे पाठ फिरवली.बाबा सिद्दिकी हे १९९२ ते २००२ पर्यंत नगरसेवक, १९९९ ते २०१४ या काळात वांद्रे पाश्चिमचे तीन वेळा आमदार आणि २००४ ते २००९ या आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. ते प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रसिद्धी विभागाचे निमंत्रक आहेत. महत्त्वाचे म्हणजे ते ‘वंचित बहुजन आघाडी’ च्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा आहे.बाबा सिद्दिकी विचारमंथच्या माध्यमातून त्यांनी गेल्या महिन्याभरात अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अचलपूर, अकोट, बाळापूर, पाचूर, मूर्तिजापूर, अमरावती येथे सभा घेतल्या. आणि राजकीय पक्षाने अल्पसंख्यांक समाजाला कसे डावलले याची उदाहरणे देत नाराजी व्यक्त केली आहे. बाबा सिद्दिकी यांनी सांगितले की, राजकीय पक्षांच्या मागे नेहमीच अल्पसंख्याक बांधव उभे राहिले आहेत. मात्र त्यांना पक्षाने प्रतिनिधित्व न देता नेहमीच डावलेले आहे. राज्यातील काँगेसच्या असलेल्या १५१ नगरपरिषदा मध्ये अल्पसंख्यांक समाजाला साधे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद सुद्धा दिले नाही. आता जो पक्ष समाजाला प्रतिनिधित्व व न्याय देईल त्याच्या बरोबर समाजबांधवांनी जावे, असे संकेत त्यांनी दिले.

टॅग्स :काँग्रेस