मुंबई - काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्यूस्टन येथील हाउडी मोदी या कार्यक्रमामधील भाषणाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमातील मोदींचे भाषण भारताची बौद्धिक आणि सांस्कृतिक ताकद दाखविणारे आहे. मिलिंद देवरांनी केलेल्या या ट्विटमुळे देवरा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मिलिंद देवराच्या या ट्विटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिलं आहे. मोदींनी मिलिंद देवरांचे आभार मानत सांगितले की, दिवंगत मिलिंद देवरा यांनीही अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केलेत. या दोन्ही देशातील मजबूत संबंध पाहून ते आनंदी झाले असते असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
तत्पूर्वी मिलिंद देवरा यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाउडी मोदी कार्यक्रमात केलेलं भाषण भारताच्या सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीसाठी महत्वपूर्ण होतं. माझे वडील मुरलीभाई हेदेखील भारत-अमेरिका यांच्या दृढ संबंधांतील एक शिल्पकार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा पाहुणचार आणि भारतीय अमेरिकींचे योगदान हा आपला गौरव आहे.
काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस केली होती. काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी देवरा दिल्लीत जाऊ शकतात असं बोललं जात होतं. मात्र देवरा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला आता उधाण आलं आहे.
तसेच मिलिंद देवरा यांनी नरेंद्र मोदींच्या भूमिकेचे याआधीही समर्थन केलं होतं. देशात एक देश एक निवडणूक या विषयावरुन चर्चा सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीला बहुतांश विरोधी पक्षातील नेत्यांनी बहिष्कार घातला होता. काँग्रेसनेही एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी वन नेशन वन इलेक्शनचं समर्थन केलं होतं.