यंदाचा गणेशोत्सव काही तासांवर असतांना अजूनही मुंबईतील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत.तर काही ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ५२ च्या भाजपाच्या माजी नगरसेविका प्रीती सातम यांनी आज मध्यरात्री १२.३० ते ३.०० पर्यंत चक्क जागता पाहारा देत येथील आरे भास्कर रोडच्या कॉक्रीटीकरणाचा राहिलेला पॅच कंत्राटदाराकडून तात्पुरते डांबरीकरण करून पूर्ण करून घेतला. विशेष म्हणजे संबंधित रोड खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदर काम पूर्ण करून घेतले.त्यांच्या या कामाचे सोशल मीडियावर येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
याबाबत लोकमतला अधिक माहिती देतांना प्रीती सातम म्हणाल्या की,आरे भास्कर रोडच्या कॉक्रीटीकरणाचे काम कंत्राटदराने केले,मात्र येथील सेंट झेवीयर शाळा ते गोकुळधाम ते मोहन गोखले रोड जंक्शन हा सुमारे 200मीटरचा पॅच अर्धवट सोडला.आपण सदर बाब संबंधित पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.मात्र येथील रस्ता काही पूर्ण झाला नाही. गणेशभक्तांना उद्या त्यांच्या घरी गणेश मूर्ती नेतांना तसेच येथील आरे भास्कर येथील कृत्रिम तलावात विसर्जनाच्या वेळी अर्धवट रस्त्याचा त्रास होऊ नये यांसाठी आपण कंत्राटदाराला बोलवून तात्पुरता डांबरीकरण करन सदर रस्ता पूर्ण करून घेतला.यावेळी संबंधित पालिका अधिकारी उपस्थित नसल्याने या रस्त्याच्या पॅचच्या गुणवत्ते विषयी त्यांनी शंका व्यक्त केली.
यावेळी वॉर्ड अध्यक्ष नरेश सोनकांबळे,युवा मोर्चा महामंत्री आकाश बाविस्कर,सचिन कोनोजिया व इतर कार्य कर्ते उपस्थित होते.