मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातच शिंदे गटाने ठाकरेंना पहिला धक्का दिला आहे. वरळीतील माजी नगरसेवक संतोष खरात यांनी ठाकरेंना रामराम करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे विशेषत: आदित्य ठाकरेंना धक्का बसला आहे.
संतोष खरात म्हणाले की, विकास ज्याप्रकारे व्हायला पाहिजे त्यामुळे मी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांचे काम अहोरात्र काम पाहतोय. लोकांची कामे होतायेत. त्यामुळे मी शिंदे गटात प्रवेश केला. मला कुठलेही आश्वासन दिले नाही. एकनाथ शिंदेंसारखे सर्वसामान्य कार्यकर्ते मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यांच्या नेतृत्वात काम करणे हे माझ्यासाठी भाग्याचे आहे असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत काम करणारे लोकच शिंदे यांना आवडतात. माझी कुणावरही नाराजी नाही. माझी रात्री एकनाथ शिंदेंसोबत चर्चा झाली. त्यावेळी मी त्यांना सर्व सांगितले. त्यानंतर आपण एकत्र काम करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानंतर मी पक्षप्रवेश केला असल्याची माहिती संतोष खरात यांनी दिली.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट आणि भाजपा युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुका या एकत्र लढण्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यात मुंबई महापालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेना ठाकरे गटाची एकहाती सत्ता आहे. ही सत्ता उलथावून लावण्यासाठी शिंदे गट-भाजपा एकत्रित प्रयत्न करत आहेत. त्यात राज्यातील शिवसेनेचे ४० आमदार आणि १३ खासदार शिंदे गटात सहभागी झालेत. त्यात आता मुंबई महापालिकेतील बहुतांश नगरसेवक शिंदे गटात सहभागी होतील असा दावा वारंवार शिंदे गटातील नेत्यांकडून केला जात आहे. त्यात वरळीतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाने आमदार आदित्य ठाकरेंशी साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश घेतला आहे.