Join us

माजी नगरसेविका नूरजहाँ शेख यांची आत्महत्या, तणावातून उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 5:32 AM

समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका नूरजहाँ रफीक शेख (४५) यांनी राहत्या घरी गळफास घेत सोमवारी आत्महत्या केली. मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई  - समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका नूरजहाँ रफीक शेख (४५) यांनी राहत्या घरी गळफास घेत सोमवारी आत्महत्या केली. मानसिक तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहेत.शिवाजीनगर परिसरात शेख या कुटुंबीयांसोबत राहायच्या. सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास नातेवाइकाने बेडरूमचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. मुलाने बेडरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलीस तेथे आले. त्यांनी शेख यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन करून रात्री मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. नूरजहाँ रफीक या प्रभाग क्र. १३७ च्या माजी नगरसेविका होत्या. त्यांनी दोन वेळा नगरसेवकपद भूषविले होते. तसेच प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाचा कारभारही त्यांनी सांभाळला होता. सध्या त्यांची मुलगी आयेशा शेख गोवंडीत नगरसेविका आहे. शेख यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच घटनास्थळावरून सुसाइड नोटही मिळालेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :मुंबईआत्महत्या