मुंबई : मुंबईतील नगरसेवकांची टर्म संपून वर्ष उलटायला आले, तरी माजी नगरसेवकांना नगरसेवकपदाचा मोह अद्याप आवरता आलेला नाही. पालिकेची मुदत संपूनही माजी नगरसेवकांकडून मुंबई महापालिकेचे बोधचिन्ह असलेल्या लेटरहेडचा सर्रास वापर केला जात आहे.
७ मार्च २०२२ रोजी महापालिकेची मुदत संपली असून तेव्हापासून पालिकेचे कामकाज आयुक्त इकबाल सिंग चहल हे प्रशासक म्हणून पाहत आहेत. पालिकेची मुदत संपली तेव्हा नगरसेवकांचाही कार्यकाळ संपला; मात्र अनेक नगरसेवक हे पालिकेचे लेटरहेड सर्रास वापरत आहेत. लेटरहेड वापरून पोलिसांत तक्रार करणे हे बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८नुसार बेकायदेशीर आहे. जून महिन्यात शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने लेटरहेडचा वापर केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पालिकेचे बोधचिन्ह वापरता येईल की नाही, याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना विचारले असता त्यांनी लेटरहेड वापरता येत नाही, असे सांगितले.