Join us

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीवर मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 9:11 AM

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीविरोधात एका व्यक्तीनं मारहाणीचा आरोप केला आहे.

मुंबईः माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीविरोधात एका व्यक्तीनं मारहाणीचा आरोप केला आहे. 58 वर्षांच्या पीडित राजेंद्र कुमार तिवारी यांनी या प्रकरणात पोलिसांत एफआयआर दाखल केलं आहे. माजी क्रिकेटपटू कांबळीही या प्रकरणात क्रॉस एफआयआर दाखल करणार आहेत.रविवार दुपारच्या दरम्यान मुंबईतल्या एका मॉलमध्ये राजेंद्र कुमार यांचा कांबळीच्या पत्नीला चुकून हात लागला, त्या कारणास्तव कांबळीनं त्यांना मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये गर्दी असल्यानं चालताना चुकून राजेंद्र कुमार यांचा हात कांबळीच्या पत्नीला लागला. त्यामुळे त्यांना मारहाण करण्यात आली आहे. रविवार असल्यानं मॉलमध्ये वर्दळ होती. माझे वडील माझ्या मुलीला गेमिंग झोनकडून फूड कोर्ट घेऊन चालले होते. याच दरम्यान ही घटना घडली. माझ्या वडिलांनाही कांबळीच्या पत्नीला स्पर्श झाला ते कळालं नव्हतं, अशी माहिती राजेंद्र कुमार यांचा मुलगा अंकितनं दिली आहे. त्यानं माझ्या वडिलांच्या तोंडावर मुक्का मारला, माझ्या वडिलांनाही काय होतंय हे समजलं नाही. त्यानंतर त्यांनी फूड कोर्ट येथे आल्यानंतर सर्व वृत्तांत सांगितला, असंही अंकित म्हणाला आहे. मी कांबळी जवळ गेलो तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी कांबळीनं मलाही धक्का दिला आणि शिवीगाळ केली. कांबळीच्या पत्नीनं पायातली सँडल काढली आणि मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्याकडून चुकून धक्का लागल्याचं मी त्यांना सांगितल्यानंतरही तिनं मला शिवीगाळ सुरूच ठेवली, असा वृत्तांत राजेंद्र यांनी सांगितला. या प्रकारानंतर राजेंद्र यांनी पोलिसांत तक्रार केली.राजेंद्रकुमार हे निवृत्त बँक कर्मचारी आहेत. या प्रकरणात बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 504 आणि कलम 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर कांबळीकडे विचारणा केली असता, या माणसानं माझ्या पत्नीशी दुर्व्यवहार केला आहे. मला त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा. त्यानं माझ्या पत्नीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. बांगुरनगर पोलीस स्टेशनच्या सीनियर इन्स्पेक्टर विजय बाने यांना या प्रकरणाची माहिती दिल्याचंही विनोद कांबळीनं सांगितलं आहे. 

टॅग्स :विनोद कांबळीराजेंद्र कुमारबातम्यागुन्हा