टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:05 AM2020-12-09T04:05:16+5:302020-12-09T04:05:16+5:30
ईडीची कारवाई, पैशांच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकाला अटक ईडीची कारवाई : पैशांच्या ...
ईडीची कारवाई, पैशांच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय
टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालकाला अटक
ईडीची कारवाई : पैशांच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टॉप्स ग्रुपच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी टॉप्सचे माजी संचालक एम. शशिधरन यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री उशिरा अटक केली. या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. पैशांच्या बेकायदेशीर व्यवहारात त्यांची मुख्य भूमिका असल्याचा संशय ईडीला आहे.
टॉप्स ग्रुपचे अधिकारी रमेश अय्यर यांनी दिलेल्या तक्रारीत, टॉप्स ग्रुपचे संस्थापक राहुल नंदा यांनी एमएमआरडीएच्या सुरक्षारक्षकाच्या घोटाळ्याबरोबरच निव्वळ कागदोपत्री मालमत्ता वाढवून मालमत्तेच्या चारपट पैसे परदेशात गुंतवले. यातूनच लंडनमध्ये घर घेऊन, तेथील द शिल्ड गार्डिंगमध्ये ५१ टक्के समभाग घेतल्याचा अय्यर यांचा आराेप आहे. शशिधरन हे राहुल नंदा यांचे विश्वासू होते. तसेच कंपनीचे संचालक व शेअर होल्डर असल्याने, ते पैसे ट्रान्सफर करून घेत असत. बनावट कागदपत्रे सादर करून कर्ज मिळविण्याच्या कटातही त्यांचा सहभाग असल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत.
त्यानुसार शशिधरन आणि याप्रकरणी अटक केलेल्या अमित चांडोळेची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे. या चाैकशीतून लवकरच या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
* प्रताप सरनाईक यांना समन्स
आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने पुन्हा समन्स बजावून १० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
.........................