मुंबई-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची 'वर्षा' निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीनंतर राज्याच्या माजी शालेय शिक्षणमंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर वर्षा गायकवाड शिंदेंची भेट घेण्यासाठी आत गेल्या. मुख्यमंत्री शिंदेंकडून सुरू असलेलं हे राजकीय नेत्यांच्या भेटीचं सत्र पाहता चर्चांना उधाण आलं आहे.
वर्षा गायकवाड यांच्या भेटीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण शालेय शिक्षण विभागातील काही प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच राज ठाकरेंनी आरोग्य विषयक मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. कारण राज ठाकरे यांच्या भेटीवेळी शिंदेंसोबत बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.
राज ठाकरे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं आहे. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचं प्रमुख कारण असलं तरी यात राजकीय चर्चा झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.