माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 03:54 AM2020-07-17T03:54:22+5:302020-07-17T06:49:32+5:30

प्रशासकीय सेवेत तब्बल ३४ वर्षे कार्यरत राहिलेल्या नीला या एक उत्तम सनदी अधिकारी होत्या. निवृत्तीनंतर ६ जुलै २००९ मध्ये राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Former Election Commissioner Neela Satyanarayana dies due to corona | माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन

माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आणि निवृत्त सनदी अधिकारी नीला सत्यनारायण यांचे गुरुवारी सकाळी कोरोनामुळे निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांचे पती, मुलगा व मुलीलाही ही लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्रशासकीय सेवेत तब्बल ३४ वर्षे कार्यरत राहिलेल्या नीला या एक उत्तम सनदी अधिकारी होत्या. निवृत्तीनंतर ६ जुलै २००९ मध्ये राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या राज्यात पहिल्या महिला निवडणूक आयुक्त ठरल्या. या पदावरून २०१४ मध्ये त्या निवृत्त झाल्या. लेखिका, दिग्दर्शक म्हणूनही त्यांची कारकीर्द चांगली गाजली. ललित पुस्तके, काव्यसंग्रह तसेच मार्गदर्शनपर आणि अनुवादित अशा ३५ पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी शोक व्यक्त केला आहे.

शासकीय सेवेतील तसेच जीवनातील प्रत्येक भूमिका त्या समरसून जगल्या. त्या एक कर्तव्यदक्ष अधिकारी, संवेदनशील लेखिका, धीरोदात्त माता व चिंतनशील व्यक्ती होत्या. त्यांच्या निधनाचे दु:ख सहन करण्याचे सामर्थ्य परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो, अशी प्रार्थना करतो.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

सामाजिक बांधिलकी आणि विधायक रचनात्मक कामांसाठी झोकून देण्याची वृत्ती असलेल्या कविमनाच्या अधिकारी हरपल्या.
-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहर उमटविणारे अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या नीला या महाराष्ट्रातील अनेक युवकांसमोर प्रशासकीय सेवेविषयीच्या प्रेरणास्थान होत्या.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी नीला सत्यनारायण या मार्गदर्शक, प्रेरणास्रोत होत्या. त्यांच्या निधनाने आपण एका कुशल प्रशासकाला, संवेदनशील साहित्यिकाला मुकलो.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

नीला सत्यनारायण केवळ एक उत्तम सनदी अधिकारी नव्हे, तर साहित्यिक, लेखिका, दिग्दर्शक म्हणूनही त्यांची कारकिर्द गाजली. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठीही काम केले.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण या कोरोनाच्या बळी ठरल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के असल्याची बतावणी सरकारकडून रोज केली जाते. तरीही एक वरिष्ठ निवृत्त सनदी अधिकाºयाला आपण वाचवू शकलो नाही याची आपल्याला खंत वाटायला हवी. त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. - संजय निरुपम, काँग्रेस नेते
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून नीला सत्यनारायण यांनी लोकशाही बळकटीस प्राधान्य दिले होते. त्यांच्या कारकिर्दीत निवडणूक प्रक्रियेत माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरास प्रारंभ झाला होता.
- यू.पी.एस. मदान,
राज्य निवडणूक आयुक्त

ग्रंथसंपदा - आई-बाबांची शाळा (मार्गदर्शनपर), आयुष्य जगताना एक दिवस (जी)वनातला (अनुभवकथन), एक पूर्ण - अपूर्ण (आत्मचरित्रपर), ओळखीची वाट (कवितासंग्रह), जाळरेषा (प्रशासकीय सेवेतील अनुभव), टाकीचे घावडे (प्रवासवर्णन), तिढा (कादंबरी), तुझ्याविना (कादंबरी), पुनर्भेट (अनुभवकथन), मी क्रांतिज्योती (अनुभवकथन), मैत्र (ललित लेख), रात्र वणव्याची (कादंबरी), सत्य-कथा (व्यवसाय मार्गदर्शन)

सत्यनारायण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्या एक कर्तबगार अधिकारी होत्या. शासनाच्या अनेक विभागांत त्यांनी उत्तम कामगिरी केली होती. - अशोक चव्हाण,
सार्वजनिक बांधकाममंत्री

Web Title: Former Election Commissioner Neela Satyanarayana dies due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.