‘बीएसएनएल’च्या माजी कर्मचाऱ्यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:07 AM2021-03-15T04:07:01+5:302021-03-15T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बीएसएनएलचे माजी कर्मचारी उद्या, मंगळवारी देशव्यापी आंदोलन करणार आहेत. पेन्शन वेळेत मिळावी, व्हीआरएस घेतलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बीएसएनएलचे माजी कर्मचारी उद्या, मंगळवारी देशव्यापी आंदोलन करणार आहेत. पेन्शन वेळेत मिळावी, व्हीआरएस घेतलेल्या कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम तत्काळ देण्यात यावी यांसह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
देशभरातील सर्व बीएसएनएल कार्यालयांच्या प्रवेशद्वारांवर उद्या, मंगळवारी हे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती ‘ऑल इंडिया बीएसएनएल -डॉट पेन्शनर्स असोसिएशन’ने दिली. माजी कर्मचाऱ्यांना बीएसएनएलकडून वेळेत पेन्शन दिली जात नाही. त्याचप्रमाणे व्हीआरएस घेतलेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना देय असलेली रक्कम चुकती करण्यात आलेली नाही. यामुळे माजी कर्मचारी आपल्या हक्काच्या पैशांपासून वंचित असून, कोरोनाकाळात तर कित्येक जणांवर कर्जबाजारी होण्याची वेळ ओढवली आहे. आर्थिक चणचणीतून काहीजणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणेही समोर आली आहेत, असे या संघटनेकडून सांगण्यात आले.
बीएसएनएलच्या माजी कर्मचाऱ्यांची ही वणवण थांबविण्यासाठी त्यांना वेळेत पेन्शन देण्याची व्यवस्था करावी, त्याचप्रमाणे व्हीआरएस घेतलेल्या कर्मचाऱ्यांची देय रक्कम त्यांना लवकरात लवकर अदा करावी, अशी संघटनेची मागणी आहे. या सर्व मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, मंगळवारी देशव्यापी आंदोलनाची हाक दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.