Join us  

मुंबईचे सुपुत्र नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचे निधन

By मनोहर कुंभेजकर | Published: November 10, 2023 8:29 PM

शिक्षण क्षेत्रात ते अखेर पर्यंत कार्यरत होते.उपनगर शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते.

मुंबई- नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य (92) यांचे आज सकाळी अंधेरी पश्चिम लोखंड वाला येथील निवासस्थानी निधन झाले.गेल्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते. 2014-2019 मध्ये ते नागालँडचे राज्यपाल होते.तर त्यांनी मणिपूर,अरुणाचल प्रदेश,त्रिपूरा,आसाम आदी राज्यांचा राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता.

त्यांच्या मागे पत्नी,तीन विवाहित मुलं, एक विवाहित कन्या,जावई,सूना,नातवंडे असा परिवार आहे. पद्मनाभ आचार्य यांचे बालपण संघ परिवाराशी संबंधित होते.काही काळ ते जनसंघ व भाजपात सक्रीय होते.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते.त्यांच्या पुढाकाराने उत्तर पूर्व भागातील विद्यार्थी महाराष्ट्रात आणणे व त्यांना शिक्षण देवून त्यांच्या राज्यात पाठवणे हा एक्सचेंज प्रोग्रॅम त्यांनी राबविला होता.

शिक्षण क्षेत्रात ते अखेर पर्यंत कार्यरत होते.उपनगर शिक्षण मंडळाचे ते अध्यक्ष होते.नवनविन कल्पनांनी मुलांना सामाजिक संस्कार देण्यावर त्यांचा भर होता. जुहू येथील विद्यानिधी शाळेतून इशान्यपूर्व भारतातील शाळां मध्ये विविध प्रकल्प त्यांनी सुरु केले होते. त्यांची अंतिम यात्रा वर्सोवा टेलिफोन एक्सचें जवळ, बी 101, शिव पार्वती अपार्टमेंट,  एसव्ही पटेल नगर, म्हाडा अंधेरी पश्चिम येथून सायंकाळी निघाली आणि आज रात्री आठच्या सुमारास त्यांच्या वर ओशिवरा विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.