"देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज"; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 12:31 PM2024-07-29T12:31:21+5:302024-07-29T12:39:26+5:30

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Former HM Anil Deshmukh serious allegations against DCM Devendra Fadnavis | "देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज"; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान

"देशमुखांचा तीन तासांत पर्दाफाश करण्यासाठी सज्ज"; फडणवीसांवर आरोप करताच भाजपचे आव्हान

BJP on Anil Deshmukh Allegations : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे समित कदम नावाच्या व्यक्तीला पाठवून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला. खोटे आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटलं. अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी अनिल देशमुख यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिलं आहे.

शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. "तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडे समित कदम या व्यक्तीला ५-६ वेळा पाठवलं होतं. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवारांवर मी खोटे आरोप करायचे. त्या खोट्या आरोपांचे प्रतिज्ञापत्र द्यायचं असं मला त्याने सांगितले. समित कदम आणि देवेंद्र फडणवीसांचे अतिशय घरगुती संबंध आहेत. समित कदम हा साधा नगरसेवकही नाही तरी फडणवीसांनी त्याला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे," असं अनिल देशमुख म्हणाले.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना अडकवण्याचा फडणवीसांचा डाव होता. जर मी त्या प्रतिज्ञापत्रावर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जेलमध्ये असते. हा डाव फसला म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील असाच डाव वापरला. तो यशस्वी झाला. अजित पवारांविरोधात देखील असाच डाव वापरला आणि तोसुद्धा यशस्वी झाला, असंही अनिल देशमुख म्हणाले. आता देशमुखांनी केलेल्या आरोपांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुरावे सादर करण्याचे आव्हान दिलं आहे.

"फोटोला फोटोने उत्तर आम्हालाही देता येते अनिलबाबू…यात कसला आला पराक्रम? महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याचा आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत फोटो नसेल तर आणखी कोणासोबत असेल? आम्ही तुम्हाला मागितलेले पुरावे का देत नाहीत? एकदा तुम्ही पुरावे द्या त्यानंतरच्या तीन तासांत तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज आहेत," असं चित्रा वाघ म्हणाल्या.

समित कदम कोण आहे?

मिरजचे समित कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. जनसुराज्य युवा शक्तिसोबत २००८ पासून ते काम करत आहेत. सध्या ते जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आमदार विनय कोरे यांच्यासोबत ते काम करतात. समित कदम यांनी आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नसली तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. 
 

Web Title: Former HM Anil Deshmukh serious allegations against DCM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.