Anil Deshmukh: अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 04:04 PM2022-10-21T16:04:07+5:302022-10-21T16:04:28+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.
मुंबई- राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांची दिवाळी कारागृहातच साजरी करायला लागणार आहे.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अनिल देशमुख यांना जामीन मिळाला होता. ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यावरुनच सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याने या प्रकरणातही जामीन मिळावा अशी याचिका अनिल देशमुख यांच्या वतीनं करण्यात आली होती. याच जामीन अर्जावर सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनिल देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाने भ्रष्टाचारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निकाल गुरुवारी राखून ठेवला होता. अनिल देशमुख व सीबीआयचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्जावर शुक्रवारी निर्णय देऊ, असे स्पष्ट केले होते. मात्र आज सीबीआयच्या विशेष कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख यांची दिवाळी कारागृहातच साजरी होणार आहे.
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केला व आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत सीबीआय व ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. काहीच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने देशमुख यांचा आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी जामीन मंजूर केला आणि सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.
संजय राऊतांचाही मुक्काम वाढला-
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज झाली. आता या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राऊत यांच्या जामीन अर्जावर आता २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
Sanjay Raut: मुक्काम वाढला! संजय राऊतांची दिवाळी कारागृहातच; पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला होणार https://t.co/gdswiynvL7
— Lokmat (@lokmat) October 21, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"