Join us

क्रिकेट अकादमीचा भूखंड सुनील गावसकर यांनी ३३ वर्षांनी केला परत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2022 7:18 AM

म्हाडाकडून अन्य पर्यायांची चाचपणी

मुंबई : दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना इनडोर क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी म्हाडाने दिलेला भूखंड त्यांनी ३३ वर्षांनंतर परत केला आहे. या जागेवर अकादमी उभारू न शकल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

वांद्रे पश्चिमेला मोक्याच्या जागी असलेला २१ हजार ३४८ चौरस फुटांचा भूखंड सुनील गावस्कर यांना ६० वर्षांच्या करारावर देण्यात आला होता. मात्र, ३० वर्षे उलटूनही या जागेवर प्रशिक्षण संस्था उभी न राहिल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ही जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी म्हाडाने ‘गावस्कर फाऊंडेशन’ला प्रस्तावही सादर केला होता. मधल्या काळात गावस्करांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत या जागेवर क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा विचार केला होता. यासंदर्भात दोघांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. जर हे दोन क्रिकेटपटू अकादमी सुरू करणार असतील, तर म्हाडाने मुदतवाढ द्यावी, असे आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर म्हटले होते. मात्र, तो प्रस्तावही बारगळला. 

आता गावस्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पत्र लिहून संबंधित भूखंड परत करीत असल्याचे कळवले आहे. म्हाडाने त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने या जागेचा विकास करावा. याबाबत कोणतीही मदत लागली तर देण्यास तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

जागा देताना अटी कोणत्या होत्या? 

  • संबंधित जागेवर अतिक्रमण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर म्हाडाने गावस्कर ट्रस्टला जागा परत मिळवण्यासाठीचा प्रस्ताव दिला होता. 
  • गावस्कर ट्रस्टला जागा देताना नफा न मिळवण्याच्या अटीवर इनडोर क्रिकेट अकादमी सुरू करण्याची अट म्हाडाने ठेवली होती. यात हेल्थ क्लब, फिटनेस सेंटर, जलतरण तलाव, पूल, स्क्वॅश कोर्ट आदींचा समावेश होता.
  •  ३० वर्षांपासून वापरात नसलेली ही जागा खेळासाठीच वापरात आणण्याकडे म्हाडाचा कल असून, त्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
टॅग्स :सुनील गावसकरम्हाडाआदित्य ठाकरे