उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगारास अटक, गुन्हे शाखेची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : झारखंडचे माजी उपमुख्यमंत्री, आमदार सुदेश कुमार महतो यांना १५ लाखांच्या खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला बुधवारी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-६ ने ही कारवाई केली आहे.
महतो यांचे खासगी सचिव महेंद्र कुमार शर्मा यांच्या फिर्यादीवरून झारखंड येथील गोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १४ ऑगस्ट रोजी महतो यांना फोनवरून आरोपीने १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात आरोपी शिवाजीनगर येथे असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष-६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत दळवी, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल चौगुले, पोलीस अंमलदार उज्ज्वल सावंत, संभाजी कोळेकर, सुरेश घेरडे यांनी तपास सुरू केला. दोन दिवसांच्या मेहनतीनंतर आरोपी त्यांच्या जाळ्यात अडकला. त्याने गुह्याची कबुली दिली. तो मूळचा प्रतापगडचा रहिवासी असून, झारखंडमध्ये त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. पुढील तपासासाठी त्याला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.