Join us

'जलद आणि सुलभ तंटा निवारण ही काळाची गरज’ माजी न्यायमूर्ती  मृदुला भाटकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 8:25 PM

Mridula Bhatkar News: लभ पध्दतीने,  विनाविलंब आणि वाजवी खर्चात तंटा निवारणासाठी "समेट" हे नवे व्यासपीठ निर्माण केले आहे.‌ सदर व्यासपीठ ही काळाची गरज असून अत्यंत योग्य वेळी मुंबई ग्राहक पंचायतीने हा उपक्रम हाती घेतला आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी "समेट" च्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

मुंबई - न्यायव्यवस्थेतील प्रदीर्घ विलंब, गुंतागुंतीची कार्य पध्दती आणि तंटा निवारणासाठी होणारा भरमसाठ खर्च या सर्वातून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने पर्यायी तंटा निवारण यंत्रणेत एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून मध्यस्थीने (Mediation) अथवा सलोख्याने (Conciliation) सुलभ पध्दतीने,  विनाविलंब आणि वाजवी खर्चात तंटा निवारणासाठी "समेट" हे नवे व्यासपीठ निर्माण केले आहे.‌ सदर व्यासपीठ ही काळाची गरज असून अत्यंत योग्य वेळी मुंबई ग्राहक पंचायतीने हा उपक्रम हाती घेतला आहे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी "समेट" च्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.

महारेरा सलोखा मंचाच्या उल्लेखनीय यशाने प्रेरीत होऊन मुंबई ग्राहक पंचायतीने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. Conciliation (सलोखा) आणि Mediation (मध्यस्थी) सेवा पुरविणाऱ्या या नव्या व्यवस्थेचे नाव आहे "समेट". आहे. या नव्या उपक्रमाचे उद्घाटन काल बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृहात मुंबई ग्राहक पंचायतीच्या वर्धापनदिन  सोहळ्यात  त्यांनी केले.‌

ग्राहक न्यायालयांत ५ लाखांहून अधिक तंटे प्रलंबित आहेत तर देशात सर्व न्यायालयांत मिळून  ४ कोटी ७० लाखांहून अधिक तंटे प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर महारेरामधे गेल्या चार वर्षांत दोन हजारांहून जास्त तक्रारी महारेरा सलोखा मंचांद्वारे तीन ते चार महिन्यांत किमान खर्चात सुलभ पध्दतीने निकालात काढण्यात आल्या. या यशाने प्रेरीत होऊन आणि देशातील सर्वच कोर्टातील प्रलंबित तंट्यांची भयावह वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुंबई ग्राहक पंचायतीने "समेट" हा कायद्याला मान्य असलेला जलद आणि सुलभ मार्गाने तंटा निवारणाचे व्यासपीठ निर्माण करायचा निर्णय घेतला आहे‌ असे या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष अँड. शिरीष देशपांडे यांनी सांगितले.

१९७५ मधे महागाईने होरपळून निघणाऱ्या ग्राहकांना मुंबई ग्राहक पंचायतीने जीवनावश्यक वस्तू रास्त दरात पुरविण्यासाठी सहकारावर आधारित अभिनव वितरण व्यवस्थेद्वारे एक वेगळा पर्याय देऊन मोठा दिलासा दिला. आता त्याच धर्तीवर न्यायव्यवस्थेतील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी कायद्याला मान्य असलेली Conciliation & Mediation ही तंटा निवारणाची सुलभ आणि जलद पर्यायी तंटा निवारण यंत्रणा ग्राहकांना मुंबई ग्राहक पंचायत वाजवी दरात उपलब्ध करून देणार आहे.

 या कार्यक्रमात करोना काळातही सदस्यांना संघ-पोच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्याबद्दल मुंबई, ठाणे, वसई, पालघर, पुणे आणि रायगड येथील कार्यकर्त्यांचा  न्या. मृदुला भाटकर यांच्या शुभहस्ते कै. मधुकरराव मंत्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ग्राहक चळवळीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राजेंद्र राणे, शिरीष मुळेकर, डॉ. अर्चना सबनीस, अनिता खानोलकर, पूजा जोशी - देशपांडे आणि वसुंधरा देवधर या कार्यकर्त्यांचा कै. एम. आर. पै पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सभेचे सूत्र संचालन शुभदा चौकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यवाह अनिता खानोलकर यांनी केले.

टॅग्स :मुंबईन्यायालय