विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 07:14 PM2019-01-14T19:14:20+5:302019-01-14T22:21:39+5:30
विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे.
मुंबई- विधान परिषदेचे माजी सभापती आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी प्रदीर्घ आजारानं अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख हे किडनीच्या आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर महिन्याभर उपचार सुरू होते. बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख यांचा 1 सप्टेंबर 1935मध्ये जन्म झाला होता. 1996 ते 2002 या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद भूषवलं होते. 1978, 1980, 1985 आणि 1990मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले होते. सांगलीतल्या कोकरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
तेरा वर्षापूर्वी त्यांना मूत्रपिंडाचा विकार झाला होता. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना बॉम्बे रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले. देशमुख यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी मूळ गावी कोकरुड (ता. शिराळा) येथे आणण्यात येणार येणार आहे. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशमुख यांच्या पश्चात पत्नी सरोजनी, पुत्र कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, मुलगी डॉ. शिल्पा, भाऊ फत्तेसिंगराव, सून रेणुका, जावई डॉ. मनोज असा परिवार आहे.
अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य असलेल्या शिवाजीराव देशमुख यांचा जन्म १ सप्टेंबर १९३५ रोजी तिळवणी (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोकरूड येथे झाले. माध्यमिक शिक्षण राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे, तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिराळा पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून नऊ वर्षे नोकरी केली. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ते १९६७ मध्ये बिळाशी जिल्हा परिषद मतदारसंघातून पंचायत समितीवर बिनविरोध निवडून आले. १९६७ ते १९७२ दरम्यान त्यांनी पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम केले. यादरम्यान विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९७२ ते १९७४ दरम्यान ते सांगली जिल्हा परिषदमध्ये कृषी सभापती होते. याच कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यालयात कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहण्याची संधी त्यांना मिळाली होती. १९७८ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. यानंतर सलग चार वेळा त्यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून शिराळा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. ८३ ते ८५ मध्ये सामान्य प्रशासन, गृह विभागाचे राज्य मंत्री म्हणून त्यांनी काम केले. १९८५ ला कृषी, ऊर्जा व परिवहन राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला होता. १९८५-८६ मध्ये पाटबंधारे, अन्न नागरी पुरवठा विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९८८-९० यादरम्यान पुनर्वसन व ग्रामविकास मंत्री, तर १९९१-९२ मध्ये सहकार, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण व परिवहन मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ९३-९४ ला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९९२-९६ या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. १९९६ मध्ये त्यांची विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. २००२ पुन्हा त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळाली.
२००१ मध्ये विधानपरिषदेत उत्कृष्ट भाषणाबददल राष्ट्रकुल संसदीय मंडळ व महाराष्ट्र शाखेकडून त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. २००४ मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांची निवड झाली. २००५ मध्ये युनायटेड किंगडम संसदेच्या ५२ व्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या अबूजा (नायजेरिया) येथे आयोजित बैठकीस संसदीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. २००७ मध्ये इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे झालेल्या तिसºया आशिया-भारत परिषदेला राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे प्रतिनिधी म्हणून त्यांची उपस्थिती होती. २००८ मध्ये तिसऱ्यांदा त्यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती. सलग तीन वेळा त्यांची विधानपरिषदेवर सभापतीपदी निवड झाली. २००९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते उल्लेखनीय संसदीय कारकिर्दीसाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला होता. आजअखेर ते विधानपरिषदेचे सदस्य म्हणून कार्यरत होते.
शिवाजीराव देशमुख यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी ७.४० वाजता मुंबईवरुन विमानाने रवाना होईल. सकाळी ९ वाजता ते कोल्हापूर येथे पोहोचेल. कोल्हापुरहून शिराळा काँग्रेस कमेटीमध्ये आणण्यात येईल. तेथे १० ते ११ पर्यंत ठेवण्यात येणार आहे. तेथून कोकरुडला नेण्यात येईल. तेथे १२ ते १ पर्यंत हिरा निवास याठिकाणी ठेवण्यात येईल. दुपारी २ वाजता अंत्ययात्रा निघेल. सायंकाळी ४ च्या सुमारास कोकरुड येथील पोलिस ठाण्यामागील मैदानावर अंत्यसंस्कार होतील.
गावावर शोककळा, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाची बातमी कोकरुडमध्ये समजली. त्यातच देशमुख यांच्या नावे रविवार, दि. १३ जानेवारीपासून कोकरूडमध्ये व्याख्यानमाला सुरु होती. सोमवारी ही व्याख्यानमाला सुरू होताच उर्वरीत कार्यक्रम होणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. देशमुख यांचे निधन झाल्याचे वृत्त तालुक्यात वाऱ्यासारखे पसरले. यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली. तालुक्यातील कार्यकर्त्यांनी कोकरुडकडे धाव घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते.