मुंबई :
शरद पवार आणि अजित पवार यांनी मागील काही दिवसांत भाजपला पोषक ठरतील अशी केलेली विधाने, नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेली टीका यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र समोर आले होते. मात्र, आता हाच संभ्रम दूर करण्यासाठी आघाडीतील तीनही पक्षांचे नेते सरसावले आहेत. मंगळवारी रात्री उद्धव ठाकरे-शरद पवार यांची भेट झाली. पाठोपाठ आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून, काँग्रेसचा दिल्लीतील बडा नेता पुढील आठवड्यात मुंबईत येऊन पवार-ठाकरेंची भेट घेणार आहे.
महाविकास आघाडीच्या सध्या महाराष्ट्रात वज्रमूठ सभा सुरू आहेत. दि. १ मे रोजी मुंबईत वज्रमूठ सभा होत असून, या सभेत शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील संभ्रम दूर करण्याबरोबरच आघाडी आणखी एकसंघ करण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचा बडा नेता घेणार शरद पवार-ठाकरेंची भेटपवार व ठाकरे यांच्यात भेट झाल्यानंतर काँग्रेसकडूनही आघाडीत समन्वय घडविण्याचे प्रयत्न सुरू झाले. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल पुढील आठवड्यात मुंबईत येऊन पवार-ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
दोघांमध्ये दीर्घ काळ चर्चापवारांनी अदानी प्रकरणात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेच्या विपरित भूमिका घेतल्यानंतर आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा झडू लागल्या. याच पार्श्वभूमीवर ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ काळ चर्चा झाली.
मतभेद असल्याचा विरोधकांकडून अपप्रचार : नाना पटोले- महाविकास आघाडी भक्कम असून, आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमूठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे. त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत.- महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
अंजली दमानियांचे ट्विट, सुप्रिया सुळेंचा खुलासा- अजित पवार भाजपबरोबर जाणार, अशा आशयाचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्यामुळे राज्याच्या राजकारणात दिवसभर वेगळी चर्चा सुरू झाली आहे. याप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना खुलासा केला. मी काही त्यांचे ट्विट वाचले नाही. पण त्यांचा तो अधिकार आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. - अजित पवार भाजपसोबत जाणार का? यावर...आता सध्या मुळशीमध्ये उन्ह आहे, पण १५ मिनिटांनंतर इथे पाऊस पडेल का? याचे उत्तर माझ्याकडे नाही, अशा मोजक्या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही दिवसांपूर्वी अजित पवार काही काळ नॉट रिटेबल झाले असता अशाच उलट-सुलट चर्चांना उधाण आले होेते.