एनसीबीची कारवाई, अभिनेता सुशांत राजपूत बॉलीवूड ड्रग्ज प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर उघडकीस आलेल्या बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दिया मिर्झाची माजी मॅनेजर राहिल फर्निचरवाला आणि ब्रिटिश नागरिक व्यावसायिक करण सजनानी यांना एनसीबीने अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा चौकशीअंती दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
एनसीबीने गेल्या महिन्यात जप्त केलेल्या २०० किलोग्रॅम ड्रग्स प्रकरणात सजनानी आणि फर्निचरवाला यांना अटक केली होती. दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या बॉलीवूड ड्रग्ज प्रकरणात यांचा सहभाग समोर येताच, गुरुवारी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही चौकशी सुरू असताना, एनसीबीने गुरुवारी जगतापसिंग आनंद याला अटक केली. यापूर्वी मंगळवारी सुशांतचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार यालाही एनसीबीने अटक केली आहे. ऋषिकेशवर सुशांतला ड्रग्जची सवय लावल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींंच्या चौकशीत सजनानी आणि फर्निचरवालाचा सहभाग स्पष्ट होताच, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३३ जणांना अटक करण्यात आली आहे.