अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षांचा पोटासाठी सुरू आहे संघर्ष
By admin | Published: December 17, 2015 01:53 AM2015-12-17T01:53:28+5:302015-12-17T01:53:28+5:30
नगरसेवक झाल्यावर पोटापाण्याची भ्रांत मिटते आणि नगराध्यक्ष झाल्यावर तर घरात लक्ष्मी पाणी भरू लागते, असे चित्र राजकारणात सर्रास दिसते. मात्र, अंंबरनाथचे माजी नगराध्यक्ष
- पंकज पाटील, अंबरनाथ
नगरसेवक झाल्यावर पोटापाण्याची भ्रांत मिटते आणि नगराध्यक्ष झाल्यावर तर घरात लक्ष्मी पाणी भरू लागते, असे चित्र राजकारणात सर्रास दिसते. मात्र, अंंबरनाथचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब कांबळे यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे. अर्थात, नवश्रीमंत राजकीय नेत्यांना दादासाहेबांचा हा संघर्ष दिसत नाही, ही शोकांतिका म्हणावी लागेल.
अंबरनाथ नगरपरिषदेची ११ मे १९५९ रोजी स्थापना झाली. २२ जून १९७९ रोजी भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने अंबरनाथ पालिका बरखास्त करण्यात आली. बरखास्तीनंतर तब्बल २० वर्षे पालिकेवर प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीनंतर अंबरनाथ पालिकेचा समावेश कल्याण-डोंबिवली महापालिकेत करण्यात आला. महापालिकेतून अंबरनाथ पालिका स्वतंत्र करण्यासाठी संघर्ष झाल्यावर १४ एप्रिल १९९२ रोजी पालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत घाडगेनगर प्रभागातून यशवंत शितोळे यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर दादासाहेब कांबळे यांनी डमी अर्ज भरला होता. कांबळे यांच्या नशिबी राजयोग असल्यानेच की काय, भाजपाचे शितोळे यांचा अर्ज बाद झाला. उमेदवार नसल्याने डमी अर्ज दाखल करणारे कांबळे यांना भाजपाचे अधिकृ त उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. ते आरक्षित प्रभागातून बहुमताने निवडूनदेखील आले. ३१ प्रभागांच्या निवडणुकीत सेना-भाजपाला बहुमत मिळाले. मात्र, नगराध्यक्षपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने युतीकडे अनुसूचित जातीचा केवळ एकमेव नगरसेवक दादासाहेब कांबळे हेच होते. युतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कांबळे तर जनता दलातर्फे अण्णा जावीर यांचे नाव पुढे आले. स्वप्नातही ज्या व्यक्तीने नगरसेवकाचे स्वप्न पाहिले नाही, त्या व्यक्तीला थेट नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली. १० मे १९९५ रोजी कांबळे यांची अंबरनाथच्या पहिल्या नगराध्यक्षपदी निवड झाली. अगदी हलाखीचे जीवन जगणाऱ्या या व्यक्तीसाठी नगराध्यक्षपदाचा कार्यकाल गोड स्वप्नासारखाच होता. कोणत्याही वादात न पडता आपला एक वर्षाचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाल त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. या काळात एकही आरोप त्यांच्यावर झाला नाही. मात्र, ज्या जलदगतीने कांबळे यांच्या जीवनात नगराध्यक्षपदाचा योग आला, तसे पुढे काही घडले नाही. पुढील चार वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून आपला कार्यकाल पूर्ण केला. पुढे कोणीच सहकार्य करत नसल्याने घर चालविण्यासाठी त्यांनी पालिकेच्या आवारात कामकाजासाठी येणाऱ्यांना अर्ज भरण्यासाठी मदत करणे, नागरिकांच्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून शिक्का आणि स्वाक्षरी करण्याचे काम त्यांनी सुरू केले. ते करताना लोकांनी जे काही स्वखुशीने दिले, त्याचा स्वीकार करून आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय त्यांनी केली.
कांबळेंकडे येणाऱ्या नागरिकांचा ओघ जास्त असल्याने पालिकेने त्यांना अग्निशमन विभागाच्या कार्यालयाजवळ लहानशी जागा उपलब्ध करून दिली आहे.