मुंबई: माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता दळवी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलूंड कोर्टाकडून दत्ता दळवी यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणं ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना चांगलेच भोवलं होतं. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दत्ता दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. मात्र आज न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ठाकरे गटला दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल शिवीगाळ व अपमानकारक विधान केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्याविरोधात भादंवि कलम 153 (अ),153 (ब),153(अ)(1)सी, 294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता.