आदित्यच्या लग्नाचं तुम्हाला काय करायचंय?; तुम्ही भयानक निघाले, पेडणेकरांची रामदास कदमांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:17 PM2022-09-19T18:17:28+5:302022-09-19T18:22:23+5:30
माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटातील नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई- मी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगेन की, शिवसेना तुम्ही उभी केली नाहीय. अनेक शिवसैनिकांचे खून पडलेत. अनेकांना जेलमध्ये जावं लागलं, जीवन उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झालेत. तुमचं काय योगदान? वारंवार सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा. अरे हो कितीवेळा सांगशील. आम्ही कधी नाही म्हटलंय का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही असं आम्ही म्हटलं का कधी? तुम्हाला काय संशय आहे काय? अरे आहेस ना तू त्यांचा मुलगा ते सांगायला कशाला लागतंय. तुझ्यामध्ये काही कर्तृत्व आहे का?, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.
रामदास कदम यांच्या या टीकेला माजी महापौर आणि शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम यांनी आपली पातळी सोडून विधान करण्यास सुरुवात केली आहे. हे फक्त महाराष्ट्राला आता कळतंय. बरं झालं घाण गेली, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली. रामदास कदम यांनी बाळासाहेब, उद्धव ठाकरेंनी खूप समजून घेतलं. मात्र आता तुम्ही महिलांच्या नजरेतूनही उतरलात, असं म्हणत आम्ही कधीही त्यांच्या विभागात गेलो, तर त्यांना भेटायला जायचो. पण हे भयानक निघाले, असा निशाणा किशोरी पेडणेकरांनी रामदास कदमांना लगावला.
आदित्य टूनटून उड्यामारुन मी केला, मी केला म्हणून ओरडू लागले. अरे तू काय केलं. तू अजून लग्न केलं नाही, तू काय करणार आहेस?, अशी टीका रामदास कदमांनी केली होती. यावर देखील किशोरी पेडकरांनी प्रतिक्रिया दिली. तुम्ही आदित्य ठाकरेंना लग्न करायला सांगतायं, पण तुम्हाला काय करायचं आहे, त्यांचे आई-बाबा बघून घेतील. तुम्ही कोण सांगणारे?, अशी किती मुलं आहेत की ते, बत्तीशी, पस्तिशीनंतर करतात, आणि त्यांनी नाहीच लग्न केलं, तर तुम्हाला काय करायचंय?, असा सवाल किशोरी पेडणेकरांनी उपस्थित केला.
दरम्यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरुन बघत असतील आणि सांगत असतील ते की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडलाय. माझा मुलगा उद्धव हा सोनिया गांधींच्या नादाला लागून बिघडलाय. माझे विचार घेऊन तू पुढे चल तुझ्यासोबत मी आहे असं बाळासाहेब आज वरुन सांगत असतील, असंही रामदास कदम म्हणाले.
रामदासभाई तुम्ही खुल्या मैदानात भेटा- सुषमा अंधारे
रामदास कदमांच्या या टीकेला शिवसेनेच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे नसते, तर तुम्हाला किती पदं मिळाली असती, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. तसेच रामदासभाई तुम्ही खुल्या मैदानात भेटा, समोरासमोर बोलू, असं आव्हानही सुषमा अंधारे यांनी दिलं.