Dutta Dalvi :मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्रोळीतील शिवसेना शाखेजवळ भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौर दत्ता दळवी यांना धक्काबुक्की झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे दत्ता दळवी यांना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ होत असल्याचे दिसत आहे.
विक्रोळीच्या टागोर नगर भागात हा सगळा प्रकार घडला आहे. टागोर नगर येथील शिवसेना शाखेजवळ गाडी लावत असताना अतिक्रमण केलेल्या भाजी विक्रेत्यांचे भाजीचे क्रेटला दत्ता दळवी यांनी लाथेने बाजूला केले. त्यानंतर आजूबाजूच्या भाजी विक्रेत्यांनी तिथे येवून दत्ता दळवी यांच्याशी वाद घातला. या वादाचे रुपांतर भांडणात झालं आणि दत्ता दळवी यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
"फेरीवाल्यांची दादागिरी खूप वाढली आहे. १० वर्षे त्या भागाचे प्रतिनिधित्व करत असताना कोणाची हिम्मत नव्हती. मी फेरीवाल्यांना सातत्याने त्यांच्या जागेवर बसण्यास सांगत होतो. त्या दिवशी तिथे गेल्यानंतर दुकानाच्या समोर भाजी विकण्यासाठी लावली होती. त्यापुढेही भाजीचे दोन क्रेट ठेवण्यात आले होते. मी तिथे गेलो आणि तुमचे काय चाललं आहे असा सवाल केला. त्यावेळी तिथला एका फेरीवाला माझ्या अंगावर आला. मला शिवीगाळ केली. मी त्याला उत्तर दिलं नाही. त्यानंतर मी घरी येऊन याची रितसर तक्रार केली आहे. फेरीवाल्यांना माज आला असून वॉर्ड ऑफिसर विकले गेले आहेत. लोकांना होणाऱ्या त्रासाचे लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही," असं दत्ता दळवी यांनी एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं आहे.
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही फेरीवाले हद्दीमध्ये बसत आहेत. एस वॉर्डचे स्वार्थी अधिकारी कारवाई करत नाहीत. हप्तेखाऊ लोक आहेत. हातगाड्या जप्त करुन त्या निष्कासीत करण्याचे कोर्टाचे आदेश आहे. तरीही फेरीवाले हातगाड्या घेऊन फिरत आहेत. लोकांना याचा त्रास होत आहे. मी त्यावेळी एकटा होतो. पण मी त्या फेरीवाल्यांना पुरुन उरेन एवढी ताकद माझ्याकडे आहे. ज्यांचे काम आहे त्यांनी करणे आवश्यक आहे," असेही दत्ता दळवी यांनी म्हटलं.