मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अचानक जाण्याने शिवसेना ठाकरे गटात शोककळा पसरली आहे. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे महापौर होते. मुंबई महापालिकेतील सर्वात उच्चशिक्षित नगरसेवकांपैकी एक अशी त्यांची ओळख होती.
माहितीनुसार, ३-४ दिवसांपूर्वी विश्वनाथ महाडेश्वर त्यांच्या गावावरून परत आले होते. सोमवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ जाणवू लागले. त्यानंतर तात्काळ महाडेश्वरांना व्हि एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी महाडेश्वरांचा मृत्यू झाला आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने महाडेश्वरांचा मृत्यू झाल्याची माहिती निकटवर्तीयांकडून मिळत आहे.
दुपारी १२ नंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी येतील. अंतिम दर्शनासाठी सांताकृझ पूर्व,पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येईल, त्यांनंतर दुपारी ४ वा. अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.
विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी झाला होता. मुंबईतील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पदवी घेतली होती. सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे ते माजी प्राचार्य होते. २००२ मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले. २००३ मध्ये महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. ८ मार्च २०१७ रोजी मुंबईच्या महापौरपदी महाडेश्वर विराजमान झाले. नोव्हेंबर २०१९ या कालावधीपर्यंत त्यांनी महापौरपद सांभाळले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत वांद्रे पूर्व येथून ते विधानसभेत उमेदवार म्हणून उभे होते.