मुंबई: माजी मंत्री आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील वरळी येथे कोळी बांधवांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी कोळी बांधवांसोबत पारंपरीक होळी सणाचा आनंद घेतला. तसेच, पारंपरीक वाद्यांच्या संगीतावर ठेका धरल्याचेही दिसून आले. आदित्य ठाकरेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईच्या वरळी भागातील होलिका उत्सवाचे दरवर्षी आकर्षण असते. वरळीच्या बीडीडी चाळीत चालू घडामोडींवर आधारीत विषयांवर भव्य होलिका दहन करण्यात येते. यंदाच्या वर्षी बीडीडी चाळीमध्ये समाजातील भ्रष्टाचाराविरुद्ध, गलिच्छ राजकारण, महागाई या विषयावर होळी तयार करण्यात आली आहे. यंदा महागाईमुळे गॅसचे वाढलेले दर आणि लोकांना बसलेला फटका यावर ही होळी साकारण्यात आली आहे.
दरम्यान, हिंदूं धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि प्राचीन काळापासून साजरा केला जाणाऱ्या सणांपैकी एक सण म्हणजे होळी. हिंदू धर्मातील प्रत्येक सणांचे वैशिष्ट्य हे निसर्गाशी असलेल्या नात्यांची ग्वाही देणारे असते सूर्य जेव्हा उत्तरायण (उत्तर दिशेकडे प्रस्थान) केले जाते तो दिवस मकर संक्राती म्हणून साजरा केला जाते.
वसंत ऋतूचे स्वागत हे होळी सणाच्या माध्यमातून केले जाते. या सणाला एक नवीन सुरुवात म्हणून देखील पाहिले जाते. या सणात सर्व हिंदू बांधव एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत असतात. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, प्रतीकात्मकपणे सर्व वाईट सवयी जाळून टाकण्यासाठी आणि रंगीबेरंगी आणि दोलायमान नवीन भविष्याचा मार्ग उघडण्यासाठी होलिका दहनाची प्रथा पार पाडली जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"