मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना हटवून सदा सरवणकर यांना न्यासाचं अध्यक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
सदा सरवणकर यांची सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. दादरमध्ये ह्यापूर्वी घडला नव्हता असा प्रकार ज्याने केला, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्याने बंदूक रोखली, टीव्हीवर देखील ते दाखवण्यात आलं. नंतर पोलिसांनीही सांगितलं की, गोळी त्यांच्याच बंदूकीतून चालवली गेली होती. त्या गद्दार व्यक्तीची चौकशी आणि अटक तर सोडाच, मिंधे- भाजप सरकारने आज त्यांना सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून बसवले, असा निशाणा आदित्य ठाकरेंनी ट्विटद्वारे साधला.
हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती. अटक व्हायला हवी होती, पण... ह्या कृत्याबद्दल त्याला बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय. मिंधे-भाजप गँगच्या गद्दारांचं हे कोणतं हिंदुत्व? आमच्या सणवाराला, गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखणारे हे सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष म्हणून कसे शोभतात?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच खरंतर भाजपा किंवा गृहमंत्र्यांकडून ह्या गोष्टीचा विरोध व्हायला हवा होता. पण कदाचित हे गद्दारीचं आणि महाराष्ट्रद्वेषाचं बक्षीस दिलं असेल, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, सदा सरवणकर हे दादर विधानसभेचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. सरवणकर यांची मंत्रीपदाची संधी हुकली होती. गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार गेल्याप्रकरणी सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर सदा सरवणकरांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंची कास धरली.