'सचिन तेंडुलकरला बघत मोठी झालेली आमची पिढी...'; जितेंद्र आव्हाडांनी केलं अर्जुनचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 01:15 PM2023-04-19T13:15:58+5:302023-04-19T13:49:35+5:30
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अर्जुन तेंडुलकरचं कौतुक केलं आहे.
अटीतटीच्या झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना सनरायझर्स हैदराबादला १४ धावांनी नमवले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मुंबईने २० षटकांत ५ बाद १९२ धावा उभारल्या. यानंतर हैदराबादला १९.५ षटकांत १७८ धावांमध्ये गुंडाळत मुंबईने सलग तिसरा विजय मिळवला आणि गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली. कॅमरून ग्रीनचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला.
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात २०वे षटक टाकायला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले. अखेरच्या षटकात २० धावांची गरज असताना अर्जुन गोलंदाजीला आला अन् त्याने केवळ ५ धावा देत भुवनेश्वर कुमारची विकेट देखील घेतली. अर्जुन तेंडुलकरची ही विकेट आपल्या आयपीएल करकिर्दीतील पहिली विकेट ठरली.
सध्या अर्जुन तेंडुलकरचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रिकेटर्स, अभिनेते, राजकीय नेते अर्जुन तेंडुलकरचं कौतुक करताय. याचदरम्यान माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अर्जुन तेंडुलकरचं कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलकरला बघत मोठी झालेली आमची पिढी आज त्याच्या मुलाला ग्राऊंडवर खेळताना बघतेय. काळ किती झरकन सरकतो. आपल्या मुलाला आयपीएलसारख्या स्पर्धेत खेळताना बघून सचिनला अभिमान वाटला असेल. अर्जुनने देखील उत्तम कामगिरी केली. दोघांचेही मनापासून अभिनंदन, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
@sachin_rt ला बघत मोठी झालेली आमची पिढी आज त्याच्या मुलाला ग्राऊंडवर खेळताना बघतेय. काळ किती झरकन सरकतो.आपल्या मुलाला #IPL सारख्या स्पर्धेत खेळताना बघून सचिनला अभिमान वाटला असेल.अर्जुनने देखील आज उत्तम कामगिरी केली. दोघांचेही मनापासून अभिनंदन. pic.twitter.com/NkF6oJZxW9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2023
दरम्यान, अर्जुनने आज २.५-०-१८-१ अशी स्पेल टाकली आणि त्यात ९ निर्धाव चेंडू होते. या कामगिरीनंतर सचिननं खास ट्विट केलं. मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली. कॅमेरून ग्रीनने फलंदाजी व गोलंदाजीत प्रभावी खेळ केला. इशान व तिलक यांनी फलंदाजीत चांगलं योगदान दिलं. आयपीएल दिवसेंदिवस रंजक होत चाललं आहे. आणि अखेर तेंडुलकरने आयपीएलमध्ये विकेट मिळवली, असं सचिन म्हणाला.