मुंबई - करोना विषाणूंचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून चेंबुरच्या जनतेला मदत करण्यासाठी विशेषतः पी.एल. लोखंडे मार्गावरील जनतेच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी अविरतपणे सेवा देणारे काँग्रेस नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, हंडोरे यांच्या तीन कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्या होत्या. त्यामुळे गेल्या २० दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेऊन त्यांनी कोरोनावर मात केली. आज सायंकाळी ८ वाजता ते रुग्णालयातून घरी परतले, यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा उत्साहाच्या वातावरणात स्वागत केलं.
माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे हे लॉकडाऊ काळात जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करत होते. त्यातच, मुंबई हा हॉटस्पॉट असल्याने येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. या मदतकार्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असावी, असा अंदाज आहे. शहरातील एका नामांकित रुग्णालयातील ICU मध्ये गेल्या २० दिवसांपासून त्यांच्याव उपचार सुरु होते. हंडोरे यांच्या तीन टेस्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे चिंता वाढली होती. मात्र, उपचारानंतर त्यांची चौथी टेस्ट घेण्यात आली. त्यांच्या चौथ्या टेस्टचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. हंडोरे यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. आपला लढवय्या नेता कोरोनावर मात करुन घरी परतल्याने कुटुंबीय व कार्यर्त्यांना अत्यानंद झाला आहे.