तिकीट कापलेले बावनकुळे आता तिकिटे वाटणार; भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 06:18 AM2022-08-13T06:18:22+5:302022-08-13T07:05:36+5:30
बावनकुळे यांची आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल.
- यदु जोशी
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेले तत्कालीन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. अडीच वर्षांपूर्वी तिकीट नाकारले गेलेले बावनकुळे यांची आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल.
बावनकुळे यांचे तिकीट कापल्याने समर्थकांमध्ये आणि ते ज्या तेली समाजाचे आहेत त्या समाजातही अस्वस्थता होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बावनकुळेंना उमेदवारी मिळावी म्हणून आटापिटा केला; पण भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावावरील फुली कायम ठेवली. यामुळे बहुजन समाज रुसला आणि त्याचा फटका म्हणून भाजपच्या आठ ते दहा जागा विदर्भात पडल्या, असे विश्लेषण त्यावेळी माध्यमांनी केले होते.
कामठी-नागपूर मार्गावर काही वर्षे ऑटोचालक म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकेकाळी काम केले. भाजप युवा मोर्चा, भाजप संघटनेत जबाबदाऱ्या सांभाळत ते १९९७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य झाले. २००४ पासून तीनवेळा कामठी (नागपूर) मतदारसंघातून आमदार झाले. २०१४ ते २०१९ दरम्यान ते ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री होते. नंतर प्रदेश सरचिटणीस झाले. डिसेंबर २०२१ मध्ये ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले.
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी शेलार
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी माजी मंत्री आ. आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने अनुभवी आणि मराठी चेहरा यानिमित्ताने दिला आहे. शेलार २०१७ मध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष असताना महापालिका निवडणुकीत पक्षाने तब्बल ३३ वरून ८३ जागांवर मजल मारली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळीही तेच अध्यक्ष होते आणि भाजप-शिवसेना युतीने सर्व सहाही जागा जिंकल्या होत्या. शेलार हे यापूर्वी दोनवेळा (सात वर्षे) मुंबई भाजपचे अध्यक्ष राहिले आहेत. २०१९ मध्ये ते फडणवीस सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्री होते.