Join us

'मला ते अजूनही कळलेलं नाही'; दीपक सावंत यांनी सांगितलं शिंदे गटात जाण्यामागचं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 7:50 PM

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाल्यानंतर दीपक सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मुंबई: राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक दीपक सावंत यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दीपक सावंत यांच्या स्वरुपात उद्धव ठाकरेंना गेल्या दोन दिवसात दुसरा मोठा धक्का बसला आहे. याआधी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई यांनी शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. आता दीपक सावंत यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे.  

एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाल्यानंतर दीपक सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर एकत्र काम केले आहे, त्यांच्या कामाचा उरक माहीत आहे. कोरोना काळात त्यांनी सेंटर्स उभे केले आणि काम सुरू केले. त्यांच्याबरोबर आरोग्याशी निगडित काम करता येईल म्हणून शिंदे गटात प्रवेश केला, असे दीपक सावंत यांनी सांगितले. तसेच मला मंत्रीपद नको मला फक्त काम हवे आहे. गेले ३ वर्षे मी काम मागत होतो. मला घरी का बसवले त्याचे कारण अजूनही कळलं नाही, असं दीपक सावंत यावेळी म्हणाले.

दीपक सावंत यांनी दुर्गम भागात शिवसेनेसाठी मोठं काम केलं आहे. आरोग्यमंत्री असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सेवा दिली. कमी बोलणारे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून जास्त काम करणारे अशी त्यांची ओळख आहे. कोरोना काळातही त्यांनी चांगलं काम केलं होतं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

दरम्यान, जानेवारी २०१९ मध्ये डॉ. दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेने विलास पोतनीस यांना उमेदवारी देत सावंत यांना डच्चू दिला होता. दीपक सावंत यांच्या कार्यपद्धतीबाबत शिवसैनिकांमध्ये आणि विशेष करून युवासेनेमध्ये त्यावेळी नाराजी होती. त्यामुळे सावंत यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती त्यावेळी पुढे आली होती.

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेना