मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली; सदाभाऊ खोत यांच्यावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 11:47 PM2022-06-09T23:47:52+5:302022-06-09T23:48:04+5:30

पाहुणा पै आला तरच सोबत असायची. अशा दारिद्यात कधी भाजीला तेल आहे तर कधी चटणी नाही. कधी भाजीऐवजी ठेचा तर कधी लाल मिरचीची चटणी आणि बुक्का असं बेताचंच आमचं राहणीमान होतं

Former Minister Sadabhau Khot's sister passes away | मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली; सदाभाऊ खोत यांच्यावर शोककळा

मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली; सदाभाऊ खोत यांच्यावर शोककळा

googlenewsNext

मुंबई - राजकारण म्हटलं तर २४ लोकांच्या गराड्यात राहावं लागतं. कुटुंबाला कमी वेळ अन् समाजासाठी वाहून घ्यावं लागते. सध्या राज्यात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या आमदारांना एकाच छताखाली ठेवले आहे. येत्या २० जूनला राज्यात विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

निवडणुकीच्या या धामधुमीत सदाभाऊ खोत यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सदाभाऊ खोत यांची बहीण त्यांच्यापासून दूर गेली आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिलीय. पोस्टमध्ये म्हटलंय की, मरळनाथपूर या छोट्याशा गावामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही लहानाचे मोठे झालो. इवलसं गाव डोंगर कपारीमध्ये असणारी शेती. उन्हाळा आला की सगळं बोखाडमाळ डोळ्यासमोर पाहीला मिळायचं. रानामध्ये जनावरांच्या मागं आम्ही भावंड गेलो की पायामध्ये सड, बोराडी चा काटा आणि अनेक काटे कुटे घुसायचे. घरात आलं की काटा घुसलेल्या पायाला बिब्याचा नाहीतर गुळाचा चटका दिला जायचा. पाय बांधला जायचा. आणि दुसऱ्या दिवशी काटा काढला जायचा. काटा जरी काढलेला असला तरी कळ मारावी म्हणून बिब्याचा चटका दिलेला असायचा. सणावाराला कधीतरी पुरणपोळी खायला मिळायची. चपातीने तर कधी आम्हाला तोंड दाखवलच नव्हतं. काळी पडलेली हायब्रीड ज्वारीची भाकरी ही आमच्या ताटात असायची. भात कधीतरी नवसालाच असायचा. अशा सगळ्या गरिबीमध्ये हा चाललेला प्रपंचाचा गाडा. गाई म्हशीचं दूध दुभतं फक्त मात्र घरात भरपूर असायचं. दूध भाकरी खायचा एक वेगळाच गोडवा मनामध्ये राहायचा. तीन चुलते त्यांची मुलं असं नाही म्हटलं तरी आमचा सगळा पंधरा-सोळा माणसांचा खटाला होता.

घर मात्र एक लहानसं खुराडं होतं. गरिबीनं मोठं घर बांधायला सुद्धा उसंत दिलेली नव्हती. कालांतराने घरातली आम्ही बहिणी भावंडं मोठी झालो. राहायला मग आम्ही शेतामध्ये घर बांधायचा निर्णय घेतला. पालाच्या घरामध्ये काही दिवस राहिल्यानंतर दोन चुलते मुंबईला आले. मुंबईल कमावलेला पैसा जमवून दगड मातीच कौलारू घर शेतामध्ये उभं राहिलं. उभ्या राहिलेल्या घरामध्ये आम्ही बहिणी भावंड राह्यला लागलो. त्या घराशेजारी माळरानांवर आजूबाजूला कुणाचंही घर नव्हतं. एकमेवं घर होतं ते आमचं होतं. दिवस उजाडला कि आम्हाला हायसं वाटायचं. रात्री चोरा चिलटांचं भय असायचं. अशा ह्या भीतीच्या छायेखालीच आम्ही लहानाचे मोठे झालो.

पाहुणा पै आला तरच सोबत असायची. अशा दारिद्यात कधी भाजीला तेल आहे तर कधी चटणी नाही. कधी भाजीऐवजी ठेचा तर कधी लाल मिरचीची चटणी आणि बुक्का असं बेताचंच आमचं राहणीमान होतं. रानातल्या पालेभाज्या खाऊन आम्ही धडधाकट होतो. ह्या गरिबीमध्ये कधी श्रीमंतीचं वारं सुद्धा कधी आम्ही पाहिलं नसल्यानं आम्ही बहिणी भावंडं आनंदाने एकत्र राहत होतो. ह्या दारिद्याचं ओझं घेऊन जगलो. ह्या दारिद्र्यामध्येच माझ्या बहिणीचं लग्न झालं. ४ जूनला तिच्या छातीमध्ये अचानक दुखू लागलं त्यावेळेस ती मुंबईलाच होती म्हणून तिला मुंबईतच एका छोट्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं आणि तिला हृदयाचा आजार असल्याचं निदान झालं. 

मी कांदा परिषदेला नाशिकच्या दौऱ्यावर होतो. मला चुलत भावाचा फोन आला. की रुक्मिणीची तब्येत बिघडली तर आता काय करावं. डॉक्टर म्हणतात की इथं ऑपरेशन होत नाही. लगेच मी तिला के. ई. एम हॉस्पिटल मुंबईमध्ये घेऊन यायला सांगितलं  आणि लगेच मी कार्यक्रम आटपून धावतपळत मुंबईला बहिणीजवळ आलो आणि तिला गुच्छ दिला आणि म्हणालो तुला लवकर बरं करायचं आहे. चेहऱ्यावर माझ्या बहिणीच्या हस खुललं अन तसं बहिणीनं अंथरुणावर उठून माझ्या कंबरेला मिठी मारली. मिठी मारल्यानंतर माझे डोळे पाणावले. ही वेड्या बहिणीची वेडी माया. आता वाट्लं ही लवकर बरी होईल.  त्यानंतर सकाळी डॉक्टरांशी बोललो उद्याच्याला ऑपरेशनला घ्यायचा निर्णय झाला. ८ जून २०२२ ला मी दुपारी कामानिमित्त बाहेर आलो आणि दुपारी मला भाच्याचा फोन आला. भाऊ धाप वाढलीय. तुम्ही लगेच दवाखान्याकडे या. मी तात्काळ दवाखान्याकडं धावत पळत गेलो. आणि तिच्याकडे गेलो असता माहीत झालं की मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेलेली होती. 

Web Title: Former Minister Sadabhau Khot's sister passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.