माजी आमदार अन् पद्मश्री लक्ष्मण मानेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, जयंत पाटलांनी केलं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:15 PM2022-07-18T16:15:22+5:302022-07-18T16:20:36+5:30
माने यांच्यासह 18 जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी, बोलताना आपला लढा संविधानविरोधी काम करणाऱ्या शक्तींविरुद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं.
मुंबई - पद्मश्री लक्ष्मण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. माने यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज मुंबईतील पक्ष कार्यालयात त्यांचा प्रवेश झाला. माने यांच्यासह 18 जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी, बोलताना आपला लढा संविधानविरोधी काम करणाऱ्या शक्तींविरुद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं.
लक्ष्मण माने यांच्यासमवेत विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे, अशोकराव जाधव यांच्यासह १८ जणांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार राजेश टोपे, आमदार बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.
पद्मश्री लक्ष्मण माने यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. तसेच छत्रपती शाहू महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. या वर्षांचे निमित्त साधून ३१ ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करायचा आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल असे लक्ष्मण माने यांनी जाहीर केले. भारताची लोकशाही सध्या धोक्यात असून आपला लढा संविधान विरोधी ज्या शक्ती काम करत आहोत. त्यांच्याविरोधात आहे. हा लढा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहनही लक्ष्मण माने यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी ते राष्ट्रवादी
लक्ष्मण माने यांनी काही काळापूर्वीच वंचित बहुजन आघाडीत बंडखोरी करत प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, त्यांनी स्वतःच वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, या नवीन पक्षाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभेच्या तोंडावर मानेंनी नव्या पक्षाची स्थापना करून भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना चांगलं अडचणीत आणलं होतं.
राष्ट्रवादीला पुन्हा गतवैभव येईल - पाटील
उपराकार लेखक लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.