मनोहर कुंभेजकर, मुंबई: लोकसभा निवडणुकीला ३४ दिवस शिल्लक असताना उत्तर मुंबईत काँग्रेसला उमेदवार मिळत नसल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गोसालिया हे नाराज आहेत. काँग्रेसचा झेंडा उंचावण्यासाठी आपले चिरंजीव आशिष गोसालिया यांच्या अनेक समाजपोयोगी कामांची मुंबईकरांनी नोंद घेतली होती, मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांच्या कार्याची नोंद घेतली नसल्याबद्धल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
गोसालिया यांनी १९८५ ते १९९५ पर्यंत त्यांनी दोन वेळा कांदिवलीचे आमदार म्हणून तर उत्तर मुंबईतून त्यांनी खासदारकीची निवडणूक देखिल लढवली होती. गोसालीया हे मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व खजिनदार देखिल होते. आपले चिरंजीव आशिष गोसालिया यांना उत्तर मुंबईचे तिकीट मिळवण्यासाठी हा खटाटोप नसल्याचे सांगून आपली समाजपोयोगी कामे यापुढे सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत आशिष गोसालिया?
उच्चविभूषित सिव्हिल इंजिनियर पदवीधारक असणारे आशिष गोसालिया हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी सेलचे अध्यक्ष व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे ते सचिव देखील होते. आशिष गोसालिया यांनी कोविड काळात 25000 हुन अधिक नागरिकांचे मनोरंजन होण्यासाठी मराठी, हिंदी आणि गुजराथी भाषेतील चित्रपट मोफत दाखवले. 50000 नागरिकांना मोफत धान्य दिले,मुंबई व मुंबईच्या बाहेर चर्चगेट ते डहाणू रेल्वे स्थानकांवर व महत्वाच्या जागी बाकडे बसवले होते. 50000 हुन अधिक रिक्षा चालकांना मोफत अल्पोपहार दिला इतकी समाजपयोगी कामे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.