ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश
By मनोहर कुंभेजकर | Published: November 29, 2022 05:00 PM2022-11-29T17:00:07+5:302022-11-29T17:01:23+5:30
Krishna Hegde : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली असे विचारले असता कृष्णा हेगडे यांनी सांगितले की, मी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही.
मुंबई - विलेपार्ले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडत काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यात शिंदे गटात प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेगडे यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
वयाच्या 12 व्या वर्षांपासून 1979 काँग्रेसमध्ये सक्रीय असलेले आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि माजी खासदार प्रिया दत्त यांचे कट्टर समर्थक असलेल्या हेगडे यांनी 2009 साली विलेपार्ले विधानसभा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढवून ते आमदार म्हणून विजयी झाले होते.मात्र 2014 साली त्यांचा स्थानिक आमदार अँड.पराग अळवणी यांनी पराभव केला होता. मात्र माजी खासदार संजय निरुपम यांचे पटत नसल्याने त्यांनी 2016 साली काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देत भाजपात प्रवेश केला. मात्र 2020 साली त्यांनी विलेपार्ले येथील युवासेनेच्या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री अँड.अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
उद्धव ठाकरेंची साथ का सोडली असे विचारले असता कृष्णा हेगडे यांनी सांगितले की, मी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचे हेगडे म्हणाले. मात्र ठाकरे गटात कुणावरही माझी नाराजी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. विलेपार्लेतील रस्त्याच्या प्रश्न तसेच एअरपोर्ट परिसरात 1 लाख घरं, 5 लाख नागरिक राहतात, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, पक्ष संघटनवाढीत भूमिका बजावण्याची माझी इच्छा होती. या प्रमुख अपेक्षा होत्या. 50 दिवसांपूर्वी समस्या सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यांनी पक्षात प्रवेश देत मला उपनेते आणि प्रवक्ते पदे देत मोठी जबाबदारी देखील दिली याबद्धल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.