माजी आमदार कृष्णा हेगडे शिवसेनेत
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधले ‘शिवबंधन’
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप उपाध्यक्ष आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेगडे यांना ‘शिवबंधन’ बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. विलेपार्ले पुन्हा एकदा भगवा करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
कृष्णा हेगडे मूळचे काँग्रेस नेते आहेत. काँग्रेसच्या चिन्हावर विलेपार्ले येथून २००९ साली कृष्णा हेगडे आमदार म्हणून निवडून आले. माजी खासदार प्रिया दत्त यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या पराग आळवणी यांनी हेगडे यांचा पराभव केला होता. यानंतर काँग्रेसमध्ये काहीसे बाजूला पडलेल्या हेगडे यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून मागील मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा रस्ता धरला. भाजपमध्ये उपाध्यक्ष पदावर त्यांची वर्णी लागली होती. मात्र, फारशी संधी नसल्याने गेल्या काही काळापासून ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. अखेर त्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश केला. अलीकडेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे चर्चेत असले होते. हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत कारवाईची मागणी केली होती.
हेगडे आणि त्यांच्या समर्थकांसोबतच २०१९ मध्ये पार्ल्यातील मनसे उमेदवार जुईली शेंडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.
.........................