Join us

माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:08 AM

५२९ कोटी रूपयांचा कर्नाळा बँक घोटाळालोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने ...

५२९ कोटी रूपयांचा कर्नाळा बँक घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. कर्नाळा बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेले विवेक पाटील यांना मंगळवारी मुंबई ईडी झोन-२ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी अटक केली. कर्नाळा बँक घोटाळ्यात आमदार विवेक पाटील हे मुख्य आरोपी असून अनेक दिवसांपासून पाटील यांची अटकेची शक्यता वर्तविण्यात येत होती.

पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटीच्या घोटाळ्याला विवेक पाटील यांच्यासह त्यांचे संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात आले आहे. ५० हजारांपेक्षा जास्त ठेवीदारांच्या कर्नाळा बँकेत ठेवी आहेत. यामध्ये पनवेल ,उरण मधील स्थानिकांच्या ठेवी मोठ्या प्रमाणात आहेत. महाविकास आघाडी सरकार विवेक पाटील यांना कारवाईपासून वाचवत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह आमदार महेश बालदी हे विवेक पाटील यांच्यावर कारवाईसाठी प्रयत्नशील होते. दोन्ही आमदारांनी ठेवीदारांना घेऊन मोर्चे देखील काढले होते. विवेक पाटील यांना अटक करण्यासंदर्भात मुंबई ईडी झोन २ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी अटक वॉरंट काढला होता. या वॉरंटमध्ये मनी लाँडरिंगचा ठपका देखील ठेवला असून मंगळवारी रात्री पनवेल येथील राहत्या घरातून पाटील यांना अटक करण्यात आली.