Join us

माजी आमदार विवेक पाटील यांना २५ जूनपर्यंत ‘ईडी’ची कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 4:05 AM

कर्नाळा बँक कोट्यवधी घोटाळा प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे ...

कर्नाळा बँक कोट्यवधी घोटाळा प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बहुचर्चित कर्नाळा बँकेच्या शेकडो कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते व माजी आमदार विवेक पाटील यांना २५ जूनपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी मिळाली आहे. त्यांच्यानंतर अन्य आरोपींवरही आता कारवाईची टांगती तलवार असून माजी आमदार बळीराम पाटील यांना लवकरच अटक केले जाईल, असे ईडीतील सूत्रांनी सांगितले.

कर्नाळा सहकारी बँकेच्या तत्कालिन पदाधिकारी व मोठ्या कर्जबुडव्यांमुळे पनवेल, रायगड, ठाणे जिल्ह्यातील ५० हजारांहून अधिक ठेवीदार तणावात आहेत. कर्नाळा बँकेकडून बनावट कर्ज प्रकरणे व गैरव्यवहारातून गेल्या काही वर्षांत सुमारे ५२९ कोटींचा घोटाळा झाला आहे. त्याबाबत एकूण ७२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई त्वरित व्हावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून ठेवीदारांकडून जनआंदोलन करण्यात येत होते.

बँकेचे अध्यक्ष राहिलेल्या विवेक पाटील यांची वाहने व मालमत्ता ईडीने यापूर्वी जप्त केली होती. मंगळवारी त्यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी दुपारी पनवेल न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने मुख्य संशयित पाटील यांच्याकडे कसून चौकशी करणे आवश्यक असल्याने त्यांना १४ दिवसांची कोठडी मागण्यात आली. मात्र ईडी कोर्टाने त्यांना १० दिवसांचा रिमांड मंजूर केला.

सुमारे ५२९ कोटींच्या बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ७६ जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये उपाध्यक्ष, संचालक मंडळ, बँकेचे आजी-माजी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींचा समावेश आहे.

....................................